उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

औरंगाबाद : संरक्षण क्षेत्रातील यंत्रसामुग्री निर्मिती करण्याचा उद्योग उभारण्यासाठीचा एक प्रस्ताव राज्याकडून केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. याशिवाय केंद्र पुरस्कृत इलेक्ट्रॉनिक पार्क, ड्रगपार्क, फुड पार्कसारख्या उद्योगांमधील प्रकल्पही राज्यात आणि त्यातही दिल्ली-मुंबई कॉरिडॉर क्षेत्रात उभे करण्याविषयी राज्य आग्रही असून त्यासंदर्भात नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यापुढे भूमिका मांडली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी येथे दिली.

राज्यात विहानसारखे औद्योगिक शहर आकारास आलेले असून केंद्र पुरस्कृत उद्योगांसाठीच्या योजना राबवण्यात महाराष्ट्र सक्षम असल्याची मांडणीही कांत यांच्यापुढे केली जाणार आहे. शनिवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर येत असलेले कांत यांच्यापुढे सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावातून ते राज्याला निश्चित काहीतरी देतील. त्यांच्या भेटीचा औरंगाबादसह राज्याला फायदा होईल, अशी अपेक्षाही देसाई यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना देसाई यांनी करोनाची रुग्णसंख्या, लसीकरण झालेले व २१ जूननंतरचे नियोजन, संभाव्य तिसरी लाट व त्या पार्श्वभूमीवर मुलांना वाटत असणारा धोका पाहता जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपायांची माहिती दिली. देसाई म्हणाले, करोनाच्या दुसऱ्या लाटेत १९६४ पर्यंत गेलेली रुग्णसंख्या आता १६४ च्या आसपास आलेली आहे. ज्येष्ठांनी लसीकरण करावे. ४१ मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर असला तरी सध्याची घटती रुग्णसंख्या पाहता ऑक्सिजन १५ मेट्रिक टनच लागत आहे. ११ ऑक्सिजनचे प्रकल्पही तयार होत आहेत. २१ जूननंतर १८ वर्षांपुढील वयाच्या ३२ लाख ८७ नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्टय़ ठेवले आहे. बालकांसाठी ३०० कृत्रिम श्वसनयंत्रासह खाटा उपलब्ध ठेवण्यात आलेल्या आहेत.

खासगी रुग्णालयांकडून अधिकचे देयके आकारण्यात आल्याबद्दलच्या तक्रारींवर बोलताना देसाई म्हणाले, जिल्हा प्रशासनाने ५७ लेखापरीक्षक नियुक्त केलेले आहेत. ९७ रुग्णालयांचे अंकेक्षण झालेले आहे. १५ रुग्णालयांमध्ये गैरप्रकार आढळून आलेले आहेत. ६५ लाखांच्या वसुलीसंदर्भात नोटिसी पाठवण्यात आलेल्या असून १ कोटी ४१ लाखांचे देयके कमी करण्यात आले आहेत.

औरंगाबाद-शिर्डी रस्ता

औरंगाबाद ते शिर्डी हा ८८ किमीचा रस्त्याचा प्रस्ताव असून राज्य सरकार ते राज्य रस्ते विकास मंडळाकडून काम करून घेण्याचा विचार करत अ्सल्याचे देसाई यांनी सांगितले. धुळे-सोलापूर, औरंगाबाद-पैठण रस्त्याचेही काम प्रगतीपथावर अ्सल्याचे त्यांनी सांगितले.

शहराला वाढीव पाणी

शहराच्या पाणीपुरवठयाच्या योजनेवर बोलताना देसाई यांनी डिसेंबपर्यंत २० एमएलडी तर मार्चपर्यंत त्यात आणखी ३० एमएलडीची वाढ करून ५० एमएलडी पाणी देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. संत एकनाथ मंदिर रंगमंदिरासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ४ कोटी देण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.