पावसाअभावी जेमतेम ३ टक्केच पेरण्या

औरंगाबाद : पावसाने पाठ फिरवल्याने पेरणीसाठी मृग नक्षत्राच्या मुहुर्ताने यंदा शेतकऱ्यांना हुलकावणी दिलेली आहे. औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्य़ांमध्ये जेमतेम अडीच ते ३ टक्क्य़ांच्या आतच पेरणी झालेली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर तरी मोठय़ा पावसासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यंदा रोहिणी नक्षत्रातील दहा ते बारा दिवस कमी-जास्त प्रमाणात पावसाचे राहिले. मृगातही चांगला पाऊस होईल आणि पेरणी करता येईल, या शेतकऱ्यांच्या आशेवर पाठ फिरवलेल्या पावसाने पाणी फेरले. मृगातील पेरणी ही शुभ मानली जाते. पिकांना रोगराईपासून वाचवणारी असते, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. परंतु ८ जून रोजी सुरू झालेले मृग नक्षत्र २० जून, रविवारी मध्यरात्री संपणार असून २१ जूनपासून आद्रा नक्षत्रारंभ होणार आहे. मराठवाडय़ातील बहुतांश भागात संपूर्ण मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. आता आद्रा नक्षत्रातच पेरणी करावी लागणार आहे.

औरंगाबाद, जालना व बीड या विभागातील तीन जिल्ह्य़ांमध्ये जेमतेम तीन टक्क्य़ांपर्यंतच पेरणी झालेली आहे. त्यातही बीडमध्ये तीन टक्के तर जालन्यात सहा टक्क्य़ांवर पेरणी झालेली आहे. औरंगाबादेत एक टक्काही पेरणी झाल्याची नोंद नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

शेतकरी विश्वंभर हाके यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्रात झालेला पाऊस आणि यंदा हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज पाहून बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवली आहेत. मात्र, मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊसच झालेला नाही. मृग नक्षत्रातील पेरणी ही शुभ मानली जाते, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. आता मृग नक्षत्रातील पेरणीची आशा पूर्णपणे मावळली आहे.

बी-बियाण्यांचे दुकानदार राजेश चावले म्हणाले, पावसाअभावी शेतकऱ्यांनी पुरेसे पेरणीचे साहित्य खरेदी केलेले नाही. पेरणीयोग्य पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

दमदार पावसासाठी आणखी आठ दिवस तरी प्रतीक्षा करावी लागेल. सध्या पूर्व भारतात व पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर आहे. बंगालच्या भागात कमी-जास्त हवामान होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर आणखी सात ते आठ दिवस मोठय़ा पावसाची शक्यता कमी आहे. पुढील काही दिवस शेतकऱ्यांनी पेरणी करावी, अशी परिस्थिती नाही. हवेच्या जोरामुळे मोसमी पाऊस स्थिरावत नाही. उष्णता वाढल्यानंतर दुपारच्या सुमारास हलका पाऊस येऊन जातो.

– श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएमचे एपीजे अब्दुल कलाम अंतराळ आणि विज्ञान केंद्र.