औरंगाबाद: करोना संसर्ग काहिसा कमी होत असला तरी इंजेक्शनचा तुटवडा मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे.  करोनाकाळात परिस्थिती टिपेला असतानाही रेमडेसिविरसारख्या तुटवडय़ाची फारशी ओरड होऊ  न देता व्यवस्थापन करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सलाईनची कमतरता जाणवत आहे. अपुरा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी चार दिवस लागणार असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी चार हजार सलाईन बाटल्या घाटी रुग्णालयात देण्याचे ठरविले आहे.

दोन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा अधिक वाढला असून महापालिकेमधील इंजेक्शनही संपले आहेत. त्यामुळे  रुग्णांच्या नातेवाइकांची चिंता वाढली आहे. दरम्यान रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच संसर्ग होण्याचे शंभरी प्रमाणही आता ८.३२ पर्यंत खाली आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.६२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मृत्यू दर कमी होत असल्याचा दावा वैद्यकीय प्रशासनाकडून केला जात आहे.

ग्रामीण भागातील संसर्ग वाढत असताना पायाभूत औषधे संपत असल्याची ओरड मात्र आता ऐकू येऊ लागली आहे. या अनुषंगाने खासदार इम्तियाज जलील म्हणाले,की घाटी हे अतिगंभीर करोना रुग्ण बरे करण्याचे रुग्णालय आहे. तिथे सलाईन सारखे पायाभूत औषध नसणे हे लाजिरवाणे आहे. पुरवठाधारकाकडून हे औषध दोन दिवसानंतर मिळेल असे सांगण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात वापरात यावे म्हणून चार हजार बाटल्या सलाईन देण्याचे ठरविले आहे.

रुग्णसंख्या कमी झाल्याने प्राणवायू मागणीत काहीशी घट झाली असून प्रत्येक जिल्ह्यात आता नव्या प्राणवायू प्रकल्प निर्मितीस गती मिळत आहे. मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्ह्यात पाच प्राणवायू निर्मितीचे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. गेल्या काही दिवसापासून रेमडेसिविरची ओरड मात्र सर्व जिल्ह्यात कायम आहे.