औरंगाबाद : या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते ‘राजा’ असतील तर, मी ‘सरदार’ तरी आहे. मला दलित चळवळीमध्ये डावलले जाऊ शकत नाही. रिपब्लिकन ऐक्य व्हायला हवं आणि ते फक्त प्रकाश आंबेडकरच करू शकतात. मात्र माझे मंत्रिपद घालवण्यासाठी हे ऐक्य होत असेल तर, मी शिवसेना-भाजपा सोबतच मी राहणार असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमासाठी औरंगाबादमध्ये आले असता त्यांनी सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला.

नामविस्तार दिनाच्या ‘एक विचार एक मंच’ आठवले गटाने फारकत घेतली असून आपला स्वतंत्र मंच उभारला आहे. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, ऐक्य करण्यासाठी मी सकारात्मक आहे. एका दिवशी स्टेजवर येऊन ते होणार नाही, त्यासाठी फॉर्म्युला तयार करण्याची गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय ते होऊ शकत नाही. मात्र ऐक्य झालं की फुटता येणार नाही आणि कोणी फुटले तर त्यांच्यासोबत जायचे नाही. हे समाजाने ठरवले तरच हे ऐक्य टिकेल. नेते स्वतःच्या फायद्यासाठी फुटले तर समाज एकसंध राहिला हवा.

१९९५ ला सर्व एकत्र आल्यावर चार खासदार निवडून आले. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन पक्षाची स्थापना केली. तसे होता कामा नये असे आठवले म्हणाले. मात्र, माझे मंत्रिपद घालवण्यासाठी ऐक्य होत असेल तर, मी शिवसेना-भाजपा सोबतच राहणार असल्याची भुमिका त्यांनी मांडली. भाजपाला पाठींबा देताना अनेक लोकांशी चर्चा केली. त्यावर भाजपा-शिवसेनेसोबत जायला सगळ्यांनी समंती दिली. त्यामुळे मी निर्णय घेतल्याच आठवले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यघटना आणि आरक्षणासंदर्भात सकारात्मक आहेत. ती बदलण्याचे कोणी दुसरे बोलत असेल तर त्याला बदलवून टाकू. देश पुढे जात असताना कायद्यात बदल करण्यास बाबासाहेबांनी पाठिंबा दिला. मात्र, घटनेचा मूळ ढाचा बदलता येणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.

कोरेगाव भीमातील घटना दुर्देवी

कोरेगाव भीमातील घटना दुर्देवी असून हा प्रकार दलित आणि मराठा समाजामध्ये वाद पेटवण्याचा प्रयत्न आहे. या घटनेनंतर जी नावे समोर येत आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रकरणात जे चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे मागे घ्यावे अशी मागणीही केल्याचे यावेळी आठवले म्हणाले.

बंदमध्ये माझा पक्ष आघाडीवर

कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. परंतू बंदमध्ये माझा पक्ष आघाडीवर होता. मात्र, मंत्री असल्याने मी जास्त बोलू शकत नव्हतो, त्यामुळे मी बॅकफुटवर गेलो असे कुणी समजू नये. बाळासाहेब बाबासाहेबांचे नातू आहेत. त्यामुळे ते मोठे असल्याचे आठवले म्हणाले. भीमा-कोरेगाव प्रकरणात दलित आणि मराठा असा वाद पेटणं महाराष्ट्राच्या फायद्याचे नाही. गावगाडा चालण्यासाठी दोन्ही समाजानी एकत्र राहण गरजेचे आहे. दलितांवर हल्ले झाले नाही, तर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही. मात्र, चुकीच्या पद्धतीने अट्रॉसिटीचा वापर होत असेल तर मी कार्यकर्त्यांना याबाबत सांगेल, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. भीमा कोरेगाव येथील हल्ला पूर्वनियोजित होता. त्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांनी मदत करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

जिग्नेशने आंबेडकराईट व्हावे

जिग्नेश मेवानीबद्दल बोलत असताना त्याच्या भाषणामुळे दंगल झाली. या मताशी आपण सहमत नाही. मात्र, त्याची विचारसरणीही आपल्याला मान्य नसल्याचे आठवले म्हणाले. जिग्नेशला चांगली लिडरशीप करायची असेल, तर त्याने आंबडेकराईट व्हावे नक्षलवादाचा सहारा घेऊ नये, असा सल्ला यावेळी आठवले यांनी दिला.