करोनाकाळात आक्रसलेली हवाई वाहतूक आता पूर्वपदावर येत असून नवीन वर्षांत म्हणजे सर्वाधिक ३४८ उड्डाणे झाली असून २२ हजार ८८९ हवाई प्रवासी वाहतूक झाली. औरंगाबाद, हैदराबाद, बंगळूरु, चेन्नई, कोलकाता येथे देशांतर्गत होणारी उड्डाणे सुरू असतानाच बुधवारी औरंगाबाद-अहमदाबाद अशी विमानसेवा दररोज सुरू करण्यात आली आहे. इंडिगो आणि एअर इंडिया या दोन हवाई कंपन्या औरंगाबाद शहरातून हवाई वाहतूक सांभाळत असून करोनामुळे दुबई आणि बँकॉक येथे प्रस्तावित हवाई मार्ग कधी सुरू होतील या विषयी शंका व्यक्त केल्या जात आहेत.

करोना विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळ लेणी पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्या. परदेशात गेलेल्या आणि करोना भीतीमुळे उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेकांना परतणे शक्य झाले नव्हते. जसजसे टाळेबंदीचे निर्बंध शिथिल होत गेले तसतसे हवाई प्रवासीसंख्या वाढत गेल्याची आकडेवारी आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये सर्वाधिक २८५ उड्डाणे डिसेंबरमध्ये करण्यात आली. पण प्रवासीसंख्या वाढू लागली ती सप्टेंबरपासून. नोव्हेंबर २०२० मध्ये सर्वाधिक २० हजार ५८७ प्रवाशांनी विमान प्रवास केला. हा प्रवास आरोग्य आणि जिल्हा प्रशासनासाठी मात्र डोकदुखी होता. येणाऱ्या प्रवासी व्यक्तीचे विलगीकरण करणे त्यांच्या आरटीपीसीआर चाचणी करणे हे काम करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत होते. सर्वाधिक भीतिदायक वातावरण मे महिन्यात होते. मे महिन्यातील १२ विमान उड्डाणांमध्ये प्रवासीसंख्या केवळ १२ एवढी होती. आता उड्डाणसंख्या वाढू लागली आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधी ११६१ उड्डाणे झाली तर ६६ हजार ९०५ जणांनी हवाई प्रवास केला.

धावपट्टीच्या विस्तारीकरणाची मोजणी

औरंगाबाद येथून आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे व्हावीत अशी मागणी वारंवार होते. मात्र हे सर्व निर्णय विमान कंपन्यांच्या नफा-नुकसानीवर घेतले जातील असे नागरी उड्डाण राज्यमंत्री हरदीप पुरी यांनी खासदार इम्तियाज जलील यांना कळविले आहे. येत्या काळात आंतरराष्ट्रीय विमानतळांची उड्डाणे वाढवायची असतील तर धावपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव कासवगतीने पुढे सरकत आहे. सध्याची दोन हजार ८३९ मीटर लांबीची धावपट्टी ८२५ मीटर धावपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया महसूल विभागाकडून सुरू असली तरी हे काम होण्यास किती वेळ लागेल याचे उत्तर कोणाकडेच नाही.  हवाई वाहतूक वाढविण्याची मागणी नव्याने जोर धरू लागली आहे. करोनाचा अनेक देशांतील प्रकोप लक्षात घेता आंतरराष्ट्रीय वाहतूक झटपट वाढण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येते.

आकडेवारी

महिना  उड्डाणे प्रवासी संख्या

एप्रिल   ०५ ०५

मे                १२ १२

जून २६ ४८९

जुलै ७२ ३४९९

ऑगस्ट ११० ६१७६

सप्टेंबर १५० ९३६३

महिना  उड्डाणे         प्रवासी

संख्या

ऑक्टोबर   २३२           १५०५९

नोव्हेंबर २६९ २०५८७

डिसेंबर २८५ ११७१५

एकूण   ११६१   ६६९०५

गेल्या काही महिन्यांत करोनामुळे घटलेला हवाई प्रवासी आलेख आता वाढू लागला आहे. नव्याने औरंगाबादहून अहमदाबादला उड्डाण सुरू करण्यात आले आहे. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल. अनेक देशांत अजूनही करोना विषाणूचा फैलाव होत आहे. त्यामुळे प्रवास तुलनेने कमी असला तरी देशांतर्गत वाहतूक आणि विशेषत: औरंगाबाद विमानतळावरील वाहतूक सुरळीत होत आहे.

– डी. जी. साळवे, संचालक औरंगाबाद विमानतळ