कन्नड मतदारसंघात विकासकामांसाठी निधी मिळत नाही, तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द केला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात विविध कामांसाठी निधीची तरतूद न झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा ठपका ठेवत त्यांनी राजीनामा दिला आहे. जाधव यांचे राजीनामापत्र मिळाले असून ते राजीखुशीने दिले आहे काय, याची विचारणा पुन्हा एकदा करू आणि नंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
शिवसेना-भाजपमधील ताणतणावात भर टाकणाऱ्या जाधव यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून राज्य सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. दुष्काळ निधी न मिळणे, पाणीपुरवठय़ाच्या योजनांना राज्य सरकारकडे निधी शिल्लक नसणे, ६ धरणांसाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र असूनही कन्नड मतदारसंघात कामे होत नाहीत, जलयुक्त शिवारच्या कामातही गैरव्यवहार असून बरीच कामे अपूर्ण आहेत. मतदारसंघासाठी मंजूर काम सुरूही झाले नाही.
निविदा प्रक्रिया होऊन मार्चअखेरीस विकासकामे होणार नाहीत, असा दावा करीत जाधव यांनी तीन पानी राजीनामा पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले.विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयसिंह राजपूत यांचा पराभव केला होता. जाधव यांना ६२ हजार ५४२ मते मिळाली होती. मतदारसंघात काम होत नसल्याची तक्रार आमदार जाधव गेल्या काही दिवसांपासून करीत होते. जिल्हा नियोजन समितीतून स्थानिक रस्ते व जलसंधारणाची कामे घेण्याची आवश्यकता होती. मात्र, मराठवाडय़ात विकास योजनांचा खर्च केवळ २७ टक्के आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी १० कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली होती. मात्र, ही रक्कम फडणवीस सरकारने स्थगित केली. जलसंधारण खात्यामार्फत हे बंधारे बांधण्याच्या कामास मज्जाव केला. हिवाळी अधिवेशनात कन्नड मतदारसंघाच्या विकासासाठी एकही योजना नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे. या मतदारसंघात रब्बी हंगाम चांगला होऊ शकला असता. मात्र, वेळेवर रोहित्र मिळाले नसल्याचाही त्यांचा आरोप आहे. शासन दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या पापात वाटेकरी होऊन बदनाम व्हायचे नाही, असे ठणकावून सांगत जाधव यांनी राजीनामा सादर केला.

‘यासारखे दुर्दैव नाही’!
हर्षवर्धन जाधव हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. या नात्याचा उल्लेखही राजीनामा पत्रात शेवटच्या भागात करीत सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि प्रदेशाध्यक्षाचा जावई, असे नाते सांगून राजीनामा देण्याची वेळ यावी, या सारखे दुर्दैव नाही, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.