22 November 2017

News Flash

भाजपला रोखणाऱ्यांचे नेतृत्व आता शिवसेनेकडे

भाजप प्रदेशाध्यक्षांच्याच जिल्ह्य़ात सेनेने काँग्रेसची युती करून भाजपची घोडदौड रोखली

प्रतिनिधी, औरंगाबाद | Updated: March 17, 2017 1:44 AM

मराठवाडय़ातील पंचायत समितीतील चित्र, सत्तेसाठी सोयीची आघाडी; भाजप प्रदेशाध्यक्षांच्याच जिल्ह्य़ात सेनेने काँग्रेसची युती करून भाजपची घोडदौड रोखली

मराठवाडय़ातील पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडप्रक्रियेत युती-आघाडीचे सोयीचे चित्र बघायला मिळाले. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, िहगोली या जिल्ह्य़ांमध्ये शिवसेनेने भाजपलाच शक्य तिथे सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससारख्या पारंपरिक कट्टर विरोधी पक्षाचे पाठबळ घेतले व दिले. कोठे शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला जवळ केले, तर कुरघोडी करण्यासाठी राष्ट्रवादीला जवळ केले. या खिचडीमुळे सर्वसामान्य शिवसैनिक संभ्रमात सापडला आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ात पाच पंचायत समित्यांमध्ये भाजपची सत्ता आली असली तरी सोयगाव व औरंगाबादमध्ये शिवसेनेने काँग्रेससोबत युती केली आहे. जिल्ह्य़ातील ९ पंचायत समित्यांपकी तीन ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत आहे. खुलताबाद, फुलंब्री आणि सिल्लोड या पंचायत समित्या भाजपला तर पठण ही एकमेव पं. स. शिवसेनेला स्पष्ट बहुमताच्या जोरावर काबीज करता आली. उर्वरित ठिकाणी दोन्ही पक्षांनी पारंपरिक विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतली. वैजापूरचे सभापतिपद भाजपला हे अनुसूचित जमातीसाठी राखीव गणातून निवडून आलेल्या महिला उमेदवार इंदूबाई सोनवणे यांच्या रूपात मिळाले आहे. तेथे भाजपने राष्ट्रवादीचा टेकू मिळवला आहे. वास्तविक वैजापुरात सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना राहिला आहे. भाजपचे केवळ तीनच सदस्य आहेत. मात्र सभापतिपद मिळाल्यानंतरही सत्तेत अन्य वाटा शिवसेनेला नको म्हणून भाजपने राष्ट्रवादीची मदत घेतली आहे.

भाजप सत्तेपासून रोखणार हा अंदाज शिवसेनेलाही असल्यामुळे त्यांनी औरंगाबादेत व सोयगावमध्ये भाजपला सत्तेपासून रोखले आहे. दोन्ही पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेने काँग्रेसला मदत करत उपसभापतिपद पदरात पाडून घेतले आहे. औरंगाबाद पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी भाजपने सेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन सदस्य असलेल्या शिवसेनेने आठ सदस्य निवडून आणत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला हात दिला.

जालन्यात सेना-काँग्रेस एकत्र

’राज्यमंत्री असलेले शिवसेनेचे नेते अर्जुनराव खोतकर यांनी त्यांच्या जालना पंचायत समितीत भाजपऐवजी काँग्रेसचाच हात धरला. जालना पं.स.मध्ये भाजप व शिवसेनेचे समान प्रत्येकी ७ सदस्य आहेत. सभापतिपदावरून दोन्ही पक्षात दावे-प्रतिदावे होणार हे हेरून शिवसेनेने काँग्रेसच्या चार सदस्यांची मदत घेत पंचायत समिती ताब्यात घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरदनमध्येही शिवसेनेने भाजपच्या विरोधात सभापतिपदाच्या निवडप्रक्रियेत उमेदवार उभा केला होता. तेथे सभापती व उपसभापतिपदी अनुक्रमे विलास आडगावकर व गजानन नागवे हे भाजपचे उमेदवार निवडून आले. बदनापुरात भाजपने शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. तेथे सभापती व उपसभापतिपदी शिवसेनेचेच अनुक्रमे अश्विनी मदन व श्रीराम कान्हेरे हे निवडून आले.

’बीड जिल्ह्य़ात गेवराईत शिवसेनेला राष्ट्रवादीची मदत मिळाली. तेथे केवळ भाजपला रोखण्यासाठी पंडित काका-पुतणे हे कट्टर विरोधक सत्तेत एकत्र आले आहेत. बीड पंचायत समितीत राष्ट्रवादीचे नेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेसोबतच कट्टर राजकीय विरोधक असलेले आमदार विनायक मेटे यांचा शिवसंग्राम, भाजप अशी भट्टी जमवून पंचायत समिती ताब्यात घेतली आहे. आष्टीत राष्ट्रवादी, भाजप अशी युती झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील उमरगा येथे भाजप व काँग्रेस अशी युती पाहायला मिळाली आहे. िहगोलीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेची युती झाली आहे, तर वसमत येथे राष्ट्रवादी व शिवसेना सत्तेत एकत्र आले आहेत.

First Published on March 17, 2017 1:44 am

Web Title: shiv sena vs bjp 7