18 January 2018

News Flash

‘सरकारला बुलेट ट्रेनची आस, शेतकऱ्यांच्या गळ्याला फास’

औरंगाबादेत शिवसेना महिला आघाडीचे भाजपविरोधात आंदोलन

ऑनलाइन टीम | Updated: October 2, 2017 5:17 PM

औरंगाबाद येथील क्रांती चौकात महिला आघाडीकडून ही निदर्शने करण्यात आली.

शिवसेना सत्तेत असूनही भाजपविरोधात रस्त्यावर उतरली आहे. औरंगाबादमध्ये महिला आघाडीच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर चूल मांडून स्वयंपाक करत महागाईविरोधात निषेध नोंदवला. यावेळी ‘जनता झाली दीन, कुठे गेले अच्छे दिन’ असे फलक झळकवण्यात आले. महागाई, जीएसटी, नोटाबंदी, शेतकरी कर्जमाफी यावरून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. औरंगाबाद येथील क्रांती चौकात महिला आघाडीकडून ही निदर्शने करण्यात आली.

घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. सरकारने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या मुद्द्यावरुन शिवसेना महिला आघाडीकडून सरकारवर निशाणा साधण्यात आला. महागाई कमी केली नाही, तर लोकसभा निवडणुकीत सरकारला धडा शिकवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

गॅसचे भाव वाढल्यामुळे किचन बजेट कोलमडले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी महिलांनी रस्त्यावर चूल मांडून भाकरी थापल्या. ‘सरकारला लागली बुलेट ट्रेनची आस, शेतकऱ्यांच्या गळ्याला पडलाय फास’, ‘महागाईने पसरले पाय, जनतेने करायचे काय’, भाज्यांचे भाव कडाडले, खर्चाचे बजेट कोलमडले’, असे फलक यावेळी झळकवण्यात आले.

First Published on October 2, 2017 5:17 pm

Web Title: shivsena mahila aghadi protest against bjp government in aurangabad
  1. No Comments.