कोर्टाच्या आदेशानुसार औरंगाबाद शहरात महापालिकेकडून अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई सुरु आहे. महापालिकेच्या कारवाईत पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. जाणून बुजून मंदिरांवर कारवाई केली जात आहे. तर मशिदीला अभय दिलं जातंय, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. आतापर्यंत २५ मंदिरे पाडण्यात आली. मात्र एकाही मशिदीला हात लावण्यात आलेला नाही. त्यामुळे २५ मशिदी पाडा त्यानंतरच शिवसेना मंदिर पाडायला सोबत येईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली.

महापालिका कोर्टाची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेकडून करण्यात आला. विकास कामाला आमचा विरोध नाही. मात्र, कारवाई होत असतना ती नियमानुसार आणि निष्पक्षपातीपणे करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. कोणत्या धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात येणार आहे, त्याची यादी महापालिकेने जाहीर करावी, अशी मागणी देखील शिवसेनेकडून करण्यात आली. तसेच खासगी जागेतील मंदिरे पाडण्यासाठी पालिकेचे कर्मचारी जात आहेत. खासगी जागेवरील कारवाई थांबली नाही तर घेराव घालून कारवाईत अडथळा निर्माण करु, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी दिला.
महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या यादीचा कसलाही अभ्यास न करता कारवाई करण्यात येते आहे. त्यामुळे आतापर्यंत फक्त मंदिरे पाडण्यात आली. त्यामुळे कारवाई पथकाला बोलवून मशिदीची यादी द्या, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. दर्ग्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगत मंदिर किंवा मशिद असा भेदभाव न करता नियमानुसार कारवाई होणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर शिवसेनेने कोणत्या मशिदीवर कारवाई करणार याची यादी द्या, अशी भूमिका घेत आयुक्तांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले.