News Flash

श्रमदानाची ‘बकर ईद’!

दिवसभरात ‘नाना पार्क’च्या संरक्षक भिंतीचा पाया घातला गेला.

‘नाम’च्या धोंदलगावमध्ये  ‘नाना पार्क’ उभारणार

धोंदलगावच्या हारून सय्यदचा व्यवसाय कपडे शिवण्याचा. त्याचे ३० मित्र बांधकाम करणारे मिस्त्री. हारून या तरुणाने पुढाकार घेतला आणि सर्वानी ठरवले, ‘बकर ईदला श्रमदान करायचे. गावाच्या विकासात सहभाग नोंदवायचा.’ अभिनेते नाना पाटेकर यांनी दत्तक घेतलेल्या धोंदलगावात अशाप्रकारच्या परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. या परिवर्तनासाठी १ हजार ५०० किलोमीटरहून म्हणजे हरयाणातून आलेले राधेश्याम गोमला या गावात गेले काही दिवस ठाण मांडून आहेत. गावातील रस्ते रुंद होऊ लागले आहेत. गावाच्या शेजारच्या नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. चार किलोमीटरच्या या कामामुळे १५० विहिरींचे पाणी वाढले आहे. गाव बदलत आहे, एवढे की गावातील मुस्लीम तरुणांनी आज बकर ईद श्रमदानाने साजरी केली.

सकाळी नमाज अदा केल्यानंतर हारून सय्यदबरोबर आलिम शेख, फय्याज शेख, रसिस शेख, जावेद सय्यद अशी तरुण मंडळी एकत्र आली. साडेपाच हजार लोकसंख्येच्या धोंदलगावामध्ये ३० मुस्लीम तरुणांचा व्यवसाय बांधकाम करण्याचा. एरवी ईदच्या दिवशी कोठेतरी गाडी करून भटकून यायचे, असा त्यांचा शिरस्ता. खुलताबाद किंवा दौलताबादच्या किल्ल्यावर चक्कर मारायची. मात्र, या वर्षी गावातील परिवर्तनाची कामे पाहून या तरुणांनी सण साजरा करण्याची अनोखी पद्धत ठरवली. हारूनने रात्री सगळय़ांना बोलावून घेतले. बैठक झाली. गावात एक बाग उभी करायची. गावातील सार्वजनिक जागेवर बाग करता येईल असे त्यांनी ठरवले. राधेश्याम गोमला आणि आनंद आसोलकर या ‘नाम’साठी झटणाऱ्यांनी ही कल्पना उचलून धरली. सरपंच, उपसरपंच यांच्यात ३६चा आकडा. पण गेल्या काही दिवसांपासून ते विकासाच्या कामासाठी स्वत: हजर असतात. बकर ईद साजरी करण्याचा हा अनोखा प्रयोग बघून सारा गाव एक झाला. गावातील म्हाताऱ्याकोताऱ्यांपासून ते अगदी शालेय विद्यार्थ्यांपर्यंत सर्व जणच या कामात सहभागी झाले. कोणी खडी आणत होता, तर कोणी विटा उचलत होता.

दिवसभरात ‘नाना पार्क’च्या संरक्षक भिंतीचा पाया घातला गेला. या उद्यानात आता कारंजे करण्याचा विचार असल्याचे या कामात झोकून देणारा राहुल साबळे सांगत होता. गावातील हे काम पाहून ६५ वर्षांच्या नेहाबाई शिरसाठ मोठय़ा खूश होत्या. त्या म्हणाल्या, ‘मला कोणीच नाही. मुलगा देवाघरी गेला. कुडाचे घर होते. पाऊस आला की बेचारी व्हायची. आता या संस्थेने घर बांधून दिले आहे. गावातील पोरं चांगलं काम करू लागली आहेत.’ या परिवर्तनासाठी हरयाणा राज्यात गोमला हे गाव आदर्श करणारे राधेश्याम गोमला यांनी बरीच मेहनत केली. ‘प्रत्येक व्यक्तीची समस्या असते. त्याला काहीतरी सांगायचे असते. त्याला त्याचे मत विचारले आणि त्याच्या शंकांचे समाधान केले, की सारे जुळून येते. येत्या सहा महिन्यांत हे काम अधिक वेगाने पुढे जाईल. बकर  ईदनिमित्त गावातील तरुणांनी श्रमदानाचा संकल्प करून सण साजरे करण्याचा नवा आदर्श घालून दिला आहे’, असे गोमला आवर्जून सांगतात.

सण, उत्सवातून सामाजिक भान जपलेच पाहिजे. गणेशोत्सव तर तेवढय़ासाठीच सार्वजनिक केला गेला. आताशा सामाजिक कामाच्या व्याख्या बदलू लागल्या आहेत. एवढे दिवस केवळ गणेशोत्सवादरम्यान केले जाणारे उपक्रम बकर ईदच्या निमित्ताने करण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच धोंदलगावच्या तरुणांनी केला आहे. त्याचे कौतुक तर व्हायलाच हवे, पण हा आदर्श इतरांनी घेतल्यास नव्या जाणिवा विकसित होतील.’.

– आनंद आसोलकर, कार्यकर्ते- नाम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 1:27 am

Web Title: shramdaan in the occasion of bakra eid
Next Stories
1 दरोडय़ाच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक
2 रिक्षाचालकांकडून होणारी लूट थांबणार
3 सिद्धार्थ उद्यानातील रेणू बिबटय़ाची दोन्ही पिल्ले दगावली
Just Now!
X