लातूर जिल्हय़ात ४ लाख हेक्टरपेक्षा अधिक पेरा

गेल्या १२ दिवसांपासून पावसाच्या रोजच्या हजेरीने एकीकडे जमिनीची तहान भागत असल्यामुळे शेतकऱ्यात आनंद आहे, तर दुसरीकडे आता जोमात आलेले पीक अतिपावसाने जाते की काय, अशी शंका मनात आहे. याच स्थितीत काढणीच्या वेळी अडचण येऊ नये म्हणून आतापासूनच सोयाबीनच्या काढणीचे कंत्राट मजुरांना देणे सुरू झाले आहे.

गेली दोन वष्रे कमी पाऊस असल्यामुळे शेतकरी अडचणीत होता. गावोगावच्या शेतमजुरांना हाताला काम मिळत नसल्यामुळे स्थलांतर करण्याची पाळी गतवर्षी आली होती. यावर्षी जून महिन्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यामुळे मृग नक्षत्राचा पेरणीचा मुहूर्त साधता आला, तर काही भागांत जूनअखेर पाऊस झाल्यामुळे आद्र्रा नक्षत्रात पेरण्या झाल्या. लातूर व रेणापूर तालुक्यांत उशिराने पाऊस पडल्याने सर्वात उशिरा पेरा झाला.

पसा देणारे हक्काचे पीक म्हणून खरीप हंगामात सोयाबीनलाच मोठय़ा प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे, शिवाय तुरीला भाव चांगला मिळत असल्यामुळे तुरीचा पेराही वाढतो आहे. जिल्हय़ात या वर्षी ४ लाख हेक्टरपेक्षा अधिक सोयाबीनचा पेरा झाला, तर तुरीच्या पिकाने १ लाख हेक्टरचा टप्पा ओलांडला. जून, जुल महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे चाकूर, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, निलंगा, औसा या तालुक्यांत सोयाबीनचे पीक जोमात आहे. काही ठिकाणी फुलोरा आला आहे, तर काही ठिकाणी शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित तालुक्यात चांगल्या पावसामुळे पिके अतिशय जोमात आहेत. काही हलक्या रानात अति पावसामुळे तूर पिवळी पडू लागली आहे, तर काही ठिकाणी सोयाबीनचे रान ओसाड झाले आहे.

सोयाबीनला दर २१ दिवसाने फवारणी करावी लागते हे आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माहिती झाले आहे. त्यामुळे गावोगावी शेतकरी हाती आलेले पीक टिकावे, यासाठी सोयाबीनची निगा राखण्यासाठी फवारण्या करण्यात दंग आहेत. पावसाने उघडीप न दिल्यामुळे काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर तण माजले आहे. खुरपण करण्यासाठीही पावसाने सवड दिलेली नाही. या वर्षी देशभरातच चांगला पाऊस होत असल्यामुळे खरिपाचा हंगाम चांगला राहणार आहे. गतवर्षी खरिपाच्या वाणाला चांगला बाजारभाव मिळाला. या वर्षी उत्पन्न वाढले की भाव पडणार याचा अंदाज सर्वाना आला आहे.

सोयाबीनचे बाजारभाव सध्या ३५०० ते ३६०० रुपये आहेत. सर्वसाधारणपणे सोयाबीनच्या पेऱ्याला ४० ते ५५ दिवस झालेले आहेत. १०० ते ११० दिवसानंतर हे पीक काढणीला येते. गावोगावी सोयाबीनचा पेरा मोठा असल्यामुळे काढणीच्या वेळी प्रचंड घाई असते. पाऊस पडून उन्हाचा तडाखा बसला तर शेंगा फुटून नुकसान मोठय़ा प्रमाणावर होण्याची शक्यता असते. ठरावीक वेळेतच काढणी व्हायला हवी. गावोगावी मजुरांची मर्यादित संख्या असल्यामुळे मजुरीची कामे करणाऱ्या मंडळींना आतापासूनच अनामत रक्कम देऊन कंत्राट  दिले जात आहे.

निटूर, किल्लारी, आंबुलगा, पानचिंचोली, मातोळा, लामजना अशा गावांत मजुरांना ५ ते १० हजार रुपये देऊन गुंतवून ठेवले जात आहे. काढणीच्या हंगामात जो गावचा भाव  निघेल त्यानुसार पसे देऊ. मात्र, आमच्या शेतात सर्वात अगोदर काम करावे लागेल, अशी अट घातली जाते. काही गावांत अनामत रक्कम देताना आताच काढणीचा भाव ठरवला जातो आहे.

आता शेतकऱ्याचे धाडस

सोयाबीनच्या एका पिशवीच्या पेऱ्याच्या काढणीसाठी २००० रुपयांपासून २४०० रुपयांपर्यंत भाव दिला जातो आहे. गतवर्षी पाऊस नसल्यामुळे सोयाबीनचे फारसे पीक नव्हते, त्यामुळे उत्पादनही बेताचे होते. एका पिशवीच्या काढणीला एक हजार रुपये द्या, अशी विनंती शेतमजुरांनी केली होती. मात्र, तेव्हा शेतकऱ्यांकडेही पसे द्यायची स्थिती नव्हती. यावर्षी पीक जोमदार दिसत असल्यामुळे शेतकरी आता धाडस करतो आहे.