News Flash

सोयाबीन बियाणे क्विंटलमागे १० हजार रुपयांवर!

२०२०-२०२१ च्या खरिपाच्या सोयाबीनचा शासनाकडून घोषित झालेला हमीभाव दर ३ हजार ८८० रुपये एवढा होता.

(संग्रहित छायाचित्र)

सोयाबीनच्या उत्पादित मालाची खरेदी यंदा हमीभावापेक्षा दीडपट अधिकच्या दराने झाली. परिणामी यंदाच्या खरीप हंगामात शेतक ऱ्यांना क्विंटलमागे दहा हजार रुपयांवर सोयाबीन बियाण्यांची खरेदी करावी लागण्यासारखी परिस्थिती आहे. गत खरीप हंगामात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बियाण्यांचा दर क्विंटलमागे साडेसात ते आठ हजार २०० रुपयांपर्यंत होता. यंदा त्यांचाही दर वाढण्याचा अंदाज असून त्याच्या तुलनेत खासगी कंपन्यांचेही दर अधिकचे म्हणजेच दहा ते बारा हजार रुपये क्विंटलला  असण्याचा अंदाज आहे.

गतवर्षी अतिवृष्टी होऊन सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असले तरी बाजारभावात मालाला दर मात्र उच्चांकी मिळाला. सोयाबीनची खरेदी अलीकडेच ६ हजार रुपये क्विंटलने झाली. हा दर हमीभावापेक्षा २ हजार रुपये अधिकचा राहिला. २०२०-२०२१ च्या खरिपाच्या सोयाबीनचा शासनाकडून घोषित झालेला हमीभाव दर ३ हजार ८८० रुपये एवढा होता.

सोयाबीनचा हमीभाव, बाजारातील खरेदीचा दर याचा अंदाज घेऊन सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी नर-मादी यांच्या शेतकऱ्यांकडून उगवून घेतलेल्या बियाण्यांचा करारानुसार दर ७ हजार ते ७ हजार २०० रुपये एवढा निघाला आहे. या बियाण्यांमधून २० ते ३० टक्के काळे-बेरे, उगवण क्षमता नसलेले सोयाबीन बाजूला निघेल. त्यावर थायरम, गावचो, इम्युडा क्लोरोफाईड, अशा औषधांच्या लेपनाची प्रक्रिया होईल. त्याची पुनर्बंदिस्त (रिपॅकिंग) प्रक्रिया, वाहतूक खर्च, प्रमुख विक्रेत्यांचा नफा, असे सर्व गृहीत धरून क्ंिवटलमागचा दर दहा ते बारा हजारांवर जाण्याची शक्यता येथील बियाणे विक्रीतील व्यावसायिक रितेश चावला यांनी व्यक्त केली आहे. अशीच प्रक्रिया महाबीजच्या बियाणे उत्पादनाचीही आहे. महाबीज साधारण २ हजार एकरवर बियाणे उत्पादित करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, गतवर्षीच्या खरीप हंगामासाठी महाबीजच्या जेएस-३३५ या सोयाबीन बियाण्याचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल तर ३० किलोच्या पिशवीचा दर एक हजार ६८० रुपये एवढा होता. तर ९३०५-एमएयूएस-७१ चा दर सात हजार ८०० व फुले अग्रणीचा दर ८ हजार २०० रुपये क्विंटलने होता. यंदाच्या दर निश्चितीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, असे महाबीजच्या औरंगाबाद, जालना जिल्हा व्यवस्थापक एस. के. काळे यांनी सांगितले.

महाबीजचा नुकताच पदभार स्वीकारला. खरीप हंगामासाठी सोयाबीनच्या दराबाबत विचार मंथन सुरू आहे. कृषी आयुक्त, कृषी विभागातील तज्ज्ञांच्या विचाराने दराचा निर्णय घेतला जाईल.

– राहुल रेखावार, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:02 am

Web Title: soybean seeds at rs 10000 per quintal abn 97
Next Stories
1 पद्मश्री फातिमा रफिक झकेरिया यांचे निधन
2 औरंगाबादला ५४ टन ऑक्सिजनचा पुरवठा
3 ‘महाज्योती’तील शिष्यवृत्तीची संशोधकांना प्रतीक्षा
Just Now!
X