मनपा प्रशासकाकडून निर्बंध शिथिल

औरंगाबाद : जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने क्रीडा मैदाने खुली करण्यात आली आहेत.  क्रिकेट, खो-खो या खेळांसह बंदिस्त दालनातील क्रीडा प्रकाराचा सराव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मैदानावर खेळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवून मुखपट्टीचा वापर करावा लागेल. तसेच १० वर्षांंखालील व ६५ वर्षांंवरील व्यक्तींना मैदानावर जाण्यास बंदी असेल असे महापालिका आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

मैदानावर गर्दी न होऊ देता क्रिकेट, खो-खो यासह बॅटमिंटन, लॉग टेनिस, जिम्नॅस्टिक या खेळांच्या सरावाकरिता परवानगी देण्यात आली आहे. मात्र क्रीडा स्पर्धा, खेळाचे उपक्रम, संमेलने घेण्यास बंदी असणार आहे. मैदानावर खेळाडूंना गर्दी टाळण्यासाठी अंतर नियमांचे पालन करावे तसेच दारे,खिडक्या उघडय़ा ठेवून सराव करावा. ताप, सर्दी, खोकला या सारखी लक्षणे असलेल्या  खेळाडूंना मैदानावर प्रवेश नाकारण्यात येणार आहे. दरम्यान रुग्ण प्रसार कमी असला तरी मृत्यू दर कायम असल्याने प्रशासकीय पातळीवर चिंता व्यक्त होत आहे. औरंगाबाद शहरातील मृत्यू दर २.८ टक्के एवढा आहे. क्रीडा मैदाने खुली झाल्याने प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. औरंगाबाद शहरातील जिमनॅस्टिक पट्टंच्या सरावावर टाळेबंदीनंतर निर्बंध आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकांनी या क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे.