सुहास सरदेशमुख

करोना टाळेबंदीनंतर मद्यविक्रीतून मिळणारे उत्पादन शुल्क गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के कमी असले तरी नोव्हेंबरअखेरीस ते वाढत असल्याचे आढळले. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत त्यात सात टक्के वाढ झाली आहे.

ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान देशी मद्यविक्रीमध्ये वाढ झाली. एक लाख सात हजार ८०३ लिटर्सवरची विक्री नोव्हेंबरअखेर एक लाख ३६ हजार २८३ लिटर्सवर पोहोचली. विदेशी मद्यविक्रीचे प्रमाण गेल्या महिन्यात ६.२६ टक्कय़ांहून १२.१२ टक्कय़ांवर गेले आहे. विदेशी मद्याच्या विक्रीत गेल्या नऊ महिन्यांत टाळेबंदीमध्ये २३ टक्क्य़ांची घट होती. मात्र गेल्या चार महिन्यांत वाढ दिसून आली आहे.  ऑक्टोबरच्या तुलनेत वाईनविक्री ३२ टक्क्यांनी वाढली आहे.

देशी, विदेशी आणि वाईनमधून मिळणाऱ्या करात या वेळी सात टक्क्य़ांची वाढ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातील मद्यनिर्मिती कंपन्यांकडून ३७३ कोटी ८१ कोटी ९५ लाख २४४ कोटी रुपयांचा कर मिळाला होता. या वेळी त्यात २४ कोटी ८१ लाख ८९ हजार २५४ रुपयांची वाढ झाली. आता तो कर ३९८ कोटी ६३ लाखांपेक्षा अधिक झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये मिळणाऱ्या करातील एकूण घट ४० टक्के आहे. गेल्या दहा महिन्यांत देशी, विदेशी मद्य, बीअर आणि वाईनविक्रीतून १,८३७ कोटी ८१ लाख ३८ हजार रुपयांचा महसूल मिळाला तो गेल्या वर्षी तीन हजार ५६ कोटी पाच लाख सहा हजार ५४७ एवढा होता. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत १,२१८ कोटी रुपयांचा कर कमी मिळाला.

गेल्या दहा महिन्यांतील घट

एप्रिल, मे महिन्यात टाळेबंदी असल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत उणे ९७ टक्के आणि उणे ८६ टक्के राज्य उत्पादन शुल्क घटले. अनुक्रमे ३४६ कोटी, तर ४२३ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळणे अपेक्षित होते. जसेजसे निर्बंध शिथिल होत गेले तसतसे महसूल घट कमी होत गेली. मे महिन्यात ५१ टक्के, जून, जुलै, ऑगस्टमध्ये अनुक्रमे उणे ३१, उणे २७, उणे १७ उणे चार टक्के महसूल कमी मिळाला. गेल्या दहा महिन्यांत घटलेला ९७ टक्कय़ांचा कर आता नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा वाढला आहे.

नोव्हेंबरमधील वाढ

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये देशी मद्यविक्री १२ लाख ६१ हजार ७४१ लिटर्स एवढी झाली होती. या वर्षी नोव्हेंबरमध्ये देशी मद्यविक्रीमध्ये एक लाख ३६ हजार २८३ लिटरची वाढ झाली. ही वाढ ११ टक्कय़ांनी अधिक आहे. विदेशी मद्यविक्री चार लाख ६१ हजार ६५० लिटर होती, त्यात ५५ हजार ९६७ लिटरची वाढ झाली. वाईनविक्रीतही ३२ टक्कय़ांची वाढ झाली.

गेल्या दहा महिन्यांत पाहिल्यांदा राज्य उत्पादन शुल्कामध्ये वाढ झाली आहे. ती सात टक्कय़ांनी अधिक आहे. आता महसूल स्थिरावत असल्याचे दिसून येत आहे.

– एस. एल. कदम, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क