सुहास सरदेशमुख

टाळेबंदीच्या काळात केलेल्या नियोजनामुळे तसेच इंधनपुरवठा सुरळीत करण्यात आल्यामुळे सरासरी तीन महिन्यापर्यंतचा दुरुस्ती कालावधी आता १५ ते  ३० दिवसापर्यंत खाली घसरला आहे. पूर्वी एकूण रोहित्रबिघाडाचे प्रमाण १६.५ टक्कय़ांहून १३.५ वर आले आहे. गेल्या वर्षी एक लाख १५ हजार ५८४ रोहित्रापैकी २५हजार ९०९ रोहित्रे बंद पडली होती.

या वर्षी रोहित्र संख्या एक लाख ७२ हजार ६६९ पर्यंत वाढली आणि बंद पडण्याचे प्रमाण घटले आहे.  या वर्षी कृषी उत्पन्नात वाढ करण्याच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून महावितरण अधिक सक्षमपणे काम करत असल्याचा दावा महावितरणच्या औरंगाबादचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांनी केला आहे. प्रत्येक गावात महावितरणचा अधिकारी आणि कर्मचारी पोहचला पाहिजे, असे नियोजन दिवाळीपासून करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून गावागावातील समस्या सुटू लागल्या आहेत. त्यामुळे ‘एक गाव, एक दिवस’ हा औरंगाबाद विभागातील उपक्रम  राज्यभर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वीज तोडण्यासाठी किंवा वसुलीसाठी जाणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास गावकरी सहकार्य तर करत नव्हतेच. पण बऱ्याचदा मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. पण महावितरणमधील ५५५ शाखा अभियंत्यांना एक दिवस एक गाव असे नियोजन करण्यास सांगण्यात आले. वीज खांब, झोल पडलेल्या तारा, रोहित्र दुरुस्ती यासह विविध प्रकारची कामे हाती घेतली जातील असा विश्वास देण्यात आला. टाळेबंदीमध्ये जसजशी शिथिलता मिळत गेली तसतसे देखभाल दुरस्तीचे काम हाती घेण्यात आले.

या सर्वात विलंबाने होणारे आणि अधिक मागणी असणारे काम म्हणजे रोहित्र दुरुस्ती. यासाठी लागणाऱ्या ऑइलपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. २०१९-२० मध्ये १५२१ किलोलिटर ऑइलपुरवठा करण्यात आला. एक किलोलिटर ऑइल म्हणजे एक हजार लिटर हे त्याचे एकक. फेब्रुवारी अखेपर्यंत १८२९ किलोलिटर ऑइल वितरण करण्यात आले आहे.  रोहित्र दुरुस्तीसह दिवाळीपासून विविध स्तरावर काम हाती घेण्यात आले. अभियंत्यासह गावात काम करणारा लाइनमन, त्या गावासाठी नेमलेला कंत्राटदार, दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य गावात पोहचत असल्याने महावितरणवरचा विश्वासही वाढत गेला. याच काळात आकडे वापरून वीज चोरणारेही पुढे येत राहिले. ३० हजार २१९ आकडे काढण्यात आले आणि त्यांच्याकडून १३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली.

छोटी पण महत्त्वाची कामे

खरे तर झाडांच्या फांद्या तारावर आल्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढतात. दिवाळीनंतर घेण्यात आलेल्या ४९ हजार ठिकाणच्या फांद्या काढून टाकण्यात आल्या. १८ हजार वाकलेले खांब पुन्हा नीट बसविण्यात आले. झोल पडलेल्या २९ हजार वायरची कामे पूर्ण करण्यात आली. डीपी दुरुस्तीची सात हजार २९३ कामे पूर्ण करण्यात आली. सुमारे २३०० गंजलेले खांब बदलण्यात आले. मीटर दुरुस्ती, घरातून मीटर बाहेर काढून बसविणे आदी कामे करतानाच वीज दुरुस्तीच्या २९ हजार ६०० तक्रारी दूर करण्यात आल्या. या सर्वांचा परिणाम महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सकारात्मक झाला. वीज तक्रारी कमी होत गेल्या. परिणामी रब्बीमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात महावितरण यश मिळत आहे.

एक दिवस एक गाव ही मोहीम अनेक अर्थाने यशस्वी झाली. मराठवाडय़ातील साडेचार हजार गावांपर्यंत ही मोहीम पोहचली. परिणामी गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला. एवढेच नाही तर रोहित्र दुरुस्तीचा कालावधीही कमी झाला आहे. मराठवाडय़ाच्या बाहेर रोहित्र दुरुस्तीचा कालावधी तीन महिन्यांपर्यंत जातो. मराठवाडय़ात नादुरुस्त रोहित्रांपैकी ६९ टक्के  रोहित्र १५ दिवसाच्या आत  दुरुस्त करण्यात आली. तर ३१ टक्के रोहित्र ३० दिवसाच्या आत दुरुस्त झाली. रोहित्र बिघाडाचे प्रमाणही आता कमी झाले आहे. परिणामी रब्बी हंगामाला मदत होणार आहे. या वर्षी धरणांमध्ये पाणी आहे आणि वीजही उपलब्ध असल्याने तक्रारीचे प्रमाण कमी झाले आहे.

-डॉ. नरेश गीते, सहव्यवस्थापकीय संचालक महावितरण, औरंगाबाद