रेल्वे पोलिसांचे निरीक्षण

औरंगाबाद : करोनाकाळातील रेल्वे रुळावरील आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढू लागली असल्याचे दिसून येत असल्याचे रेल्वे पोलिसाचे निरीक्षण असून गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०२० पर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला होता; त्यात १६ जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी १९ आत्महत्या झाल्या होत्या. पण या वर्षी जून महिन्यापर्यंतच १७ जणांच्या आत्महत्या झाल्या आहेत. घरगुती वाद, करोनाकाळातील ताणतणावही या आत्महत्येची कारण असल्याचे तपासात दिसून आले असून गेल्या काही महिन्यांत सात जणांना रेल्वे पोलीस व कें्रदीय रेल्वे पोलिसांनी आत्महत्यापासून रोखले असून समुपदेशन करून घरी पाठविले. पण गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.

मनमाड ते जालना जिल्ह्यातील बदनापूर या १४० किलोमीटरच्या पट्टय़ातील मृत व्यक्तींची माहिती देताना रेल्वे पोलीस विभागाचे अरविंद शर्मा म्हणाले,‘‘ गेल्या वर्षी तसे मार्च ते ऑगस्ट दरम्यान रेल्वेची वाहतूक अगदीच कमी होती. जालना येथून टाळेबंदीनंतर गावी जाण्यासाठी रेल्वे रुळावर थकून झोपलेल्या १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पण याशिवाय त्यानंतर रुळावर आढळून आलेले मृतदेह आणि गाडीच्या आडवे आल्याने झालेल्या आत्महत्या याची या वर्षीची संख्या जराशी अधिक वाटत आहे. ’ करोनाकाळातील ताणतणाव आणि घरगुती कटकटीमुळे अनेक जण आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळाकडे येत असतात. नुकतेच अशा एका महिलेला गाडी थांबवून वाचविण्यात आले. तिला व तिच्या घरातील मंडळींचेही समुपदेशन पोलिसांनी केले. औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी ते चिकलठाणा या दरम्यान आत्महत्या करणाऱ्यांचे मृतदेह आढळून येत असल्याने  रेल्वे पोलिसांनी या भागातील गस्तही वाढविली आहे. करोनाकाळात अनेकांच्या हाताला काम मिळत नव्हते तसेच टाळेबंदीमुळे घरातच राहिल्याने मानसिकतांमध्येही बदल घडत असल्याचे दिसून येत होते. त्याचे परिणाम म्हणून या वाढत्या आत्महत्यांच्या संख्येकडे पाहिले जात आहे.