औरंगाबादमध्ये वाढते करोनाचे रुग्ण आणि बाहेरी जिल्ह््यातूनही दाखल होणाऱ्या गंभीर बाधितांना आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा सध्या मुंबई, मुरबाड, चाकण येथून होत असून तो ५४ टन एवढा येत आहे. महिनाभरात ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिनी घाटीसह इतर कोविडच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना शहरात येणारा गॅस व द्रवरुपातील मिळून ५४ टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यातील बहुतांश रुग्णालये हे द्रवरूपातील ऑक्सिजनचा (एलएमओ-लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) वापर करतात. द्रवरूपातील ऑक्सिजन हा औरंगाबादेत तयार होत नसल्याने तो मुंबई, चाकण, मुरबाड येथून टँकरद्वारे मागवावा लागतो. या टँकरमधून येणाऱ्या द्रवरूपातील ऑक्सिजन संबंधित रुग्णालयातील यंत्रणेला देण्यात येतो. या रुग्णालयांच्या मागणीनुसार किलो लीटर परिमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. एक हजार किलो लीटर म्हणजे एक मेट्रिक टन आणि ७७० क्युबिक मीटर म्हणजे एक मेट्रिक टन, असे त्याचे प्रमाण असल्याचे अन्न व औषधी विभागातील सूत्रांनी सांगितले.

मागणीत वाढ

औरंगाबाद शहर व जिल्ह््यात मिळून दररोज दीड हजारांच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. शहरातील रुग्णालयांमध्ये औरंगाबादबाहेरील जिल्ह््यातूनही गंभीर रुग्णांना दाखल केले जात आहे. यातील सहव्याधीयुक्त गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. त्यामुळे ऑक्सिजनची गरज वाढली असून मार्चमध्ये १४ ते १५ मेट्रिक टनपर्यंतची मागणी आता ५४ टनपर्यंत पोहोचली आहे.

कारखान्यांचा ऑक्सिजन रुग्णांसाठी

काही कारखान्यांचे कामकाज ऑक्सिजनवर चालते. अशा कारखान्यांमधील उत्पादनाला लागणाऱ्या एकूणपैकी ८० टक्के ऑक्सिजन हा रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे कारखान्यांचे उत्पादन काहीसे कमी होणार, याची जाणीव असली तरी रुग्णांचे जीवनही तेवढेच महत्त्वाचे आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी रात्रीच्या पत्रकार बैठकीत सांगितले.