सर्वेक्षणातील धक्कादायक वास्तव

ग्रामीण भागातील १०.६२ टक्के लोकांच्या मनात एकदा तरी आत्महत्येचा विचार येत असल्याचे धक्कादायक वास्तव सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अनेक कारणांच्या गुंतागुतीतून आत्महत्या होत असल्याचे निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आले आहेत. औरंगाबाद, फुलंब्री, गंगापूर तालुक्यांतील ६८९जणांच्या मानसिक आरोग्याची पाहणी संस्थेच्या वतीने
करण्यात आली.
मराठवाडय़ात कृषी समस्येमुळे वाढत जाणाऱ्या आत्महत्यांची संख्या आता ६००हून अधिक झाली आहे. ग्रामीण भागातील व्यक्तींची मानसिकता कोणत्या कारणाने खचते, त्यांच्यामध्ये असणारी अस्वस्थता या सर्वेक्षणातून पुढे आली. माधुरी गावित व देवकी वासुदेव यांनी हे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणातील काही निष्कर्ष धक्कादायक आहेत. गेल्या १० वर्षांत मानसिकतेमध्ये मोठे बदल झाले असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण जनजीवनातील ताणही वाढला आहे. ४.६५जणांनी पूर्वी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. मुळात मानसिक आरोग्य व्यवस्थित नसण्यामागे नातेसंबंधातील लग्न हे प्रमुख कारण असल्याचेही या तज्ज्ञांचे मत आहे. ग्रामीण भागात केलेल्या या सर्वेक्षणात ३७.७ टक्केविवाह नातेसंबंधात झाले आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे. मानसिक अस्वस्थेचे हेदेखील एक कारण असल्याचे मानले जात आहे.
सर्वेक्षणादरम्यान प्रत्येक व्यक्तीच्या सहा महिन्यांतील वर्तणुकीची माहिती घेण्यात आली. त्यातून काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष हाती लागल्याचा दावा केला जात आहे. तब्बल २६.२७ टक्के लोक त्यांच्या कामावर खूश नाहीत. मानसिक दडपणाखाली शेती सोडून देण्याच्या तयारी असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. ही आकडेवारी चिंतनीय असल्याचे माधुरी गावित यांच्या निदर्शनास आले.आत्महत्या करण्याचे प्रमुख कारण शोधणे तसे अवघड व गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
केवळ नापिकी व कर्जबाजारीपण एवढी दोन कारणेच असतात असे नाही. तसेच एवढीच बाब आत्महत्येला प्रवृत्त करते असेही नाही, तर नातेसंबंधातील ताणतणाव, पुरेशी झोप, जमीन हिरावून घेतली जाण्याची भीती, घरातील व्यक्तींचे मृत्यू अशीही कारणे आत्महत्येमागे असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.
परिस्थितीशी जुळवून घेण्यात ग्रामीण भागातील माणूस कोठे ना कोठे कमी पडत आहे. तसेच मानसिक ताण कमालीचा असल्याचेही दिसून आले. दोन महिन्यांपासून झोपही व्यवस्थित लागत नसल्याच्या तक्रारी सर्वेक्षणातून पुढे आल्या. आत्महत्या थांबविण्यास केवळ नापिकी व कर्जबाजारीपणावर काम करून भागणार नाही तर अन्य उपाययोजना हाती घ्याव्या लागतील, अशी शिफारस केली जात आहे.

प्रमुख निष्कर्ष
’१२.२५ व्यक्तीमध्ये मानसिक स्वास्थ्य हरविल्याचे लक्षण.
’४.६५ टक्के व्यक्तींनी पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
’मानसिक आरोग्यातील बिघाडामागे ३७.५ टक्के नातेसंबंधातील विवाह हे प्रमुख कारण मानले जाते.
’२६.२७ टक्के लोकांना त्यांच्या कामात रस वाटत नाही.
’आत्महत्येचा विचार मनात येऊन जाण्याचे प्रमाण १०.६३ टक्के आहे.