औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रबोधनकार सीताराम ठाकरे या मुख्य सभागृहाच्या छताचा भाग कोसळला. या सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जाते. महापौर आणि आयुक्त यांच्या आसनावरील ‘पीओपी’ने बनलेला कही भाग आज कोसळला. उद्या (दि.१) याच सभागृहात तहकूब असलेली सर्वसाधरण सभा होणार होती. त्याची तयारी म्हणून साफसफाईसाठी कर्मचारी गेले असता हा प्रकार दिसून आला. छतावरील ओलाव्यामुळे तो भाग ढासळला असेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

औरंगबाद महापालिकेत तत्कालीन महापौर सुनंदा कोल्हे आणि स्थायी समितीचे तत्कालीन सभापती प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यकाळात हे सभागृह बांधण्यात आले होते. मुंबईचे तत्कालीन महापौर दिवाकर रावते यांच्या हस्ते दि. ११ मार्च १९९६ रोजी या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले होते. पालिकेवर शिवसेनेची सत्ता असल्याकारणाने या सभागृहाला प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा याच सभागृहात घेतली जाते. सभेदरम्यान आयुक्त, महापौर ज्या ठिकाणी बसतात त्याच्या आसनाच्या वरचा भाग कोसळला आहे. वंदेमातरम वरून राडा झाल्यामुळे महापौर भगवान घडामोडे यांनी मागील सर्वसाधारण सभा तहकूब केली होती. ही तहकूब सभा उद्या होणार आहे.