उत्तर भारतात महिलांची वेणी कापण्याच्या काही घटना घडल्याच्या चर्चेनंतर मुंबई-पुण्यातील लोण आता औरंगबादपर्यंत पोहोचले आहे. शहरातील शहानुरमियाँ दर्गा परिसरात राहणाऱ्या दोन सख्या बहिणीचे केस झोपेत कापले असल्याचं बोललं जात आहे. केस कापल्याचा दावा करणारी एक घटना या अगोदरही शहरात घडली आहे. त्यानंतर ही दुसरी घटना समोर आल्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे. हा संपूर्ण काय प्रकार आहे. याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

बिहार, दिल्ली, राज्यस्थान, उत्तर प्रदेश, मुंबई, पिपरी चिंचवडनंतर या विचित्र प्रकाराचे लोण थेट औरंगाबादमध्ये आले आहे. शहरात यापूर्वी सिल्कमिल्क कॉलनी भागात एका मुलीची वेणी कापण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना सोमवारी पहाटे उस्मानपुरा भागातील शहानुर मियाँ दर्गा परिसरात घरात झोपलेल्या ७ वर्षीय आणि १२ वर्षीय दोन मुलींचे केस कापण्यात आल्याचं मुलींच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. या दोन्ही सख्या बहिणी आहेत. घराचा दरवाजा आतून बंद असताना हा प्रकार घडला, असं मुलीच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं. या घटनेमुळे ७ वर्षीय चिमुकली घाबरलेली असून तिची प्रकृती खराब झाल्याने तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुलींच्या वडिलांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणात नक्की काय घडले हे नेमकेपणाने समजलेले नाही. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. याबाबत पोलीस उपाआयुक्त दीपाली घाडगे यांना विचारलं असता, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला याबाबत माहिती मिळाली असल्याचं त्यानी सांगितलं. घराचं दार बंद असताना अशा प्रकारची घटना कशी घडली. हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे. की स्वतः केस कापले याबाबत तपास करणार असल्याचं त्यानी सांगितलं. पहिल्या घटनेबाबत अद्याप कोणती माहिती मिळू शकलेली नाही. शिवाय संबंधित महिला समोर यायला तयार नसल्याचंही घाडगे यांनी यावेळी सांगितलं.