ग्रामीण भागातील बेरोजगारांचे आमदार, खासदारांना  दूरध्वनी

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : एका बाजूला करोनाचा कहर ग्रामीण भाग व्यापून टाकत असतानाच गेल्या चार महिन्यापासून टाळेबंदीच्या कचाटय़ात अडकलेल्या तरुणाईचा धीर संपत चालला आहे. काही आमदार आणि खासदारांना ‘हाताला काम द्या ना साहेब’ असे दूरध्वनी येऊ लागले आहेत. ग्रामीण भागात पूर्वी ६०-७० तरुण बेरोजगार असायचे, आता ही संख्या शंभरहून अधिक झाली आहे. पुणे- मुंबईमध्ये परतण्याचे धाडस नसणाऱ्या या तरुणांना गावात काय काम द्यावे याचा पेच निर्माण झाल्याचे लोकप्रतिनिधीही मान्य करतात. गावोगावी रोजगार हमी योजनेची कामे वाढली असली तरी कुशल कामगार म्हणून काम करणारी ही मंडळी रोजगार हमीऐवजी दुसरे काम मागत आहेत.

औसा तालुक्यातील करजगाव येथील तरुण  सचिन कदम आणि सचिन गवळी यांनी अलीकडेच खासदार ओम राजेनिंबाळकर यांना दूरध्वनी करुन आपली व्यथा मांडली. सचिन गवळी म्हणाला,‘ पूर्वी पुणे येथे कंपनीमध्ये कामाला होतो. पूर्वी एकटी म्हातारी आई गावी होती पण भीती नव्हती. आता तिला एकटीला ठेवून शहरात जाणे चुकीचे ठरेल. गावात राहिलो तर हाताला काम नाही. काय करावे म्हणून आमदार आणि खासदार यांना दूरध्वनी केले. त्यांनीही आश्वासन दिले आहे. पण आता धीर सुटत चालला आहे.’ या गावातील सचिन गवळी मुंबईला स्वयंपाकात मदतनीस म्हणून मुंबईत एका हॉटेलमध्ये काम करायचा. अजून रेस्टॉरंट सुरू झाले नाहीत. त्यामुळे गावात मुक्कामी आलेल्या गवळीच्या घरात आता वाद सुरू झाले आहेत. वडील, भाऊ दोघेही कामावर जात. मात्र, आता सगळे जण घरात बसून आहेत. आणखी किती दिवस असे जाणार माहीत नाही. कोणी तरी काम दिले तर किमान पोटापाण्याचा प्रश्न सुटेल, असे तो सांगतो.

ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेत मात्र फारशी मागणी वाढलेली नसल्याचे रोजगार हमी योजनेचे उपमुख्य कार्यकारी राजेंद्र आहिरे यांनी सांगितले. साधारणत: ३०-३५ हजार मजूर संख्या कायम आहे. आता शेतीमध्येही कामे आहेत. त्यामुळे हाताला काम नाही, असे चित्र दिसून येत नाही, असा सरकारी यंत्रणेचा दावा आहे. मात्र, ग्रामीण भागात पुणे, मंबई आणि अन्य शहरातून गावी परतलेल्यांची संख्या अजूनही लक्षणीय असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मंडळी आता दूरध्वनी करुन कामाची मागणी करू लागली आहेत.

बेरोजगारांची संख्या वाढलेली

कार्यशक्तीची व्याख्या आता बदलू लागली आहे. कुशल म्हणता येईल अशी अर्धवेळ काम करणारे मुलेही गावी परतली आहेत.  शहरात आल्यानंतरही  काम मिळेल अशी खात्री नसल्याने अस्वस्थता वाढली आहे.  स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने शहरात खोल्या करुन असणारी मुले ही आता गावीच आहेत. त्यामुळे गावातील बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे.  हाताला काम द्या पण ते कुशल असू द्या अशी मागणी वाढत चालली असल्याने रोजगार हमी योजनेच्या मूळ रचनेत बदल करावेत अशीही मागणी होऊ लागली आहे.

– प्रवीण घुगे, भाजप प्रवक्ता मंच सदस्य