आधी नऊ हजार नंतर पाच हजार रुपये आणि अखेर बेरोजगारी

फरीस खान तिशीतला तरुण. मानसशास्त्र विषयातील पदवी. पण नोकरी काही मिळाली नाही. तेव्हा संगणक शिकणारा शहाणा मानला जायचा. तोही संगणक शिकला. मौलाना आझाद महाविद्यालयातून उत्तीर्ण झाला. नोकरी काही मिळाली नाही. मग एका दूरसंचार कंपनीमध्ये कॉल सेंटरवर काम केले. तेव्हा नऊ हजार रुपये मिळायचे. आता त्या कंपनीने कॉल सेंटर बंद केले. बेरोजगारीचे नवे संकट आले. आता तो माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कोठे पाच हजार रुपयांची नोकरी मिळतेय का, याची चाचपणी करायला आला होता. फरीस खान काही एकटा तरुण नाही. कौशल्य विकास आणि कामगार विभागाच्या वतीने बारावीपर्यंत शिकलेल्या तरुणांसाठी बेरोजगार भरती मेळावा बुधवारी घेण्यात आला. त्यात बहुसंख्य माहिती आणि तंत्रज्ञान विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे तरुण होते.

मोहम्मद आमीर ‘बीसीएस’पर्यंत शिकलेला. संगणकावर त्याची बोटे वेगाने चालतात. २०१५ मध्ये तो उत्तीर्ण झाला, तेव्हा नोकरी मिळण्याची शक्यता नव्हतीच. मग हैदराबादला गेला. तेथे संकेतस्थळ  विकसित करण्यासाठीचे नवे शिक्षण घेतले. मग एका सरकारी खात्यातील डाटा एंट्रीचे काम घेणाऱ्या खासगी संस्थेत कामाला लागला. एका एंट्रीला एक रुपयाच मिळायचा,  पण काम होते म्हणून तो काम करत होता. सहा हजार रुपये मिळायचे. ते काम संपले. त्या कामाची रक्कम अजून त्याला मिळालेली नाही. मग कंपनी बदलली. प्रत्येक कंपनीत मानधनाचा आकडा कधी पाच हजार ते कधी सहा हजार. दोन-तीन महिने कसेबसे जायचे, पुन्हा बेकारी. घरी पाच बहिणी, भाऊ. वडील स्प्रे पेंटिंगचा व्यवसाय करतात. न शिकलेला एक लहान भाऊ त्यांना मदत करतो. आता मोहम्मद आमीर त्यांनाच कधीतरी मदत करतो. संगणक शिकून उपयोग काय, असा त्याचा प्रश्न!  इम्रान खान अभियंते इलेक्ट्रॉनिक शाखेतील. एका कंपनीत १५ हजार रुपये मिळायचे. ११ महिन्यांचे कंत्राट. आता ती कंपनी बंद पडणार आहे. अन्यथा देहरादूनला नोकरी करा, असा आदेश निघाला आहे. त्यामुळे बेरोजगार मेळाव्यात काही संधी मिळते का, हे पाहण्यासाठी ते आले होते. ते म्हणाले, अलीकडे आयटी सेक्टरमध्ये फुकट काम करून घेणाऱ्याही कंपन्या आहेत. ज्यांच्याकडे अनुभव नसतो, त्यांना तर दोन-तीन महिने पगार दिलाच जात नाही. मिळाला तर फक्त चार-पाच हजार रुपयेच मिळतात. इथे कोणालाच कामाची हमी नाही. त्यामुळे जेथे कोठे भरती होते, तेथे एक चक्कर मारावी लागते.

शेख फरास याचीही अशीच अवस्था. कधी काळी पाच-सात हजार रुपये मिळविणारा हा तरुण सध्या बेरोजगार आहे. अभियांत्रिकीची पदवी घेताना चार वर्षांत वडिलांनी दोन लाख ४० हजार रुपये खर्च केले होते. ती रक्कम अजूनही फिटलेली नाही. कोठे चार-पाच हजार रुपयांची असेना, नोकरी मिळावी तर बरे होईल, असे ते सांगतात. शेख फरासचे लग्न झाले आहे. त्याला एक मुलगी आहे. तो प्रश्न विचारतो, ‘आम्ही शिकून उपयोग काय झाला?’

कौशल्य विकासाच्या २००हून अधिक संस्था औरंगाबाद जिल्हय़ात आहेत, मात्र त्यांच्याकडून ज्यांना प्रशिक्षण देण्यात आले, त्यातील केवळ १७ टक्के उमेदवारांना कशीबशी नोकरी लागली, तीही चार-पाच हजारांची. आई-वडिलांनी कष्ट करून शिकवायचे. ज्या काळात, ज्या क्षेत्रात नोकरी मिळेल, असे वाटते, त्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा, त्यावर पैसा लावायचा आणि शेवटी कशीबशी मिळणारी पाच हजारांची नोकरी गेली, की पुन्हा शोधत राहायची. गेल्या काही दिवसांत मुस्लिम समाजात संगणक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक होते. आता या क्षेत्रातील मंदीमुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलीलही या माहितीला दुजोरा देतात.