काढणीला आलेल्या गहू, हरभरा, द्राक्ष आदी पिकांचे नुकसान

मराठवाडय़ातील बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड या जिल्ह्य़ांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. तर वीज पडून बीड जिल्ह्य़ात पाच जणांचा मृत्यू झाला. लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्य़ांत गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. गहू, हरभरा, द्राक्ष, आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले असून वादळवाऱ्यांमुळे शाळा आणि घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटना उस्मानाबाद जिल्ह्य़ात घडल्या.

परळी तालुक्यात कौठळी येथे शेतात गहू काढण्याचे काम करत असताना वीज पडून आश्रुबा गायकवाड आणि सुशीला कुंभार या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला आहे. केज तालुक्यातील येवताजवळ सावंतवाडी रस्त्यालगत शेतात वीज पडल्याने ओंकार सटवा निर्मळ (वय १२) हा ठार झाला असून नितीन आश्रुबा िधगाणे हे जखमी झाले आहेत. दरडवाडी येथे भागवत रावसाहेब दराडे (वय ४०) व आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे सीमा गोरख कारंडे यांचा वीज पडून मृत्यू झाला. वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जनावरे दगावल्याचे वृत्त आहे.

दुपारी दोननंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्य़ाला झोडपून काढले. बहुतांश ठिकाणी गारपीट झाली असून गहू, हरभरासह शेतातील उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. परळी, केज, माजलगाव या परिसरात अवकाळी पाऊस झाला. वादळ वाऱ्यासह झालेल्या या पावसात गारांचा सडाच पडला. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ात बुधवारी अचानकपणे जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसासोबत अनेक ठिकाणी गाराही पडल्याने ऐन काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, द्राक्ष आदी पिकांचे नुकसान झाले असून आंब्याचा मोहोर, कैऱ्याही गळून पडल्या आहेत. लातूर जिल्ह्य़ातील निलंगा तालुक्याच्या औराद शहाजनी व निटूर येथे बुधवारी पहाटे हलका पाऊस झाला. गारांसह झालेल्या या पावसामुळे सखल भागात पाणीही साठले. या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेली ज्वारी काळी पडण्याचा धोका आहे. शिवाय अनेक शेतकरी गव्हाच्या काढणीचे काम करत होते. त्यांचीही तारांबळ उडाली. रब्बीच्या हंगामातील पिकाच्या राशी शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. विशेषत: तुरांटय़ा आणि कडबा काढणीनंतर रानात तसाच पडलेला असल्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले. पावसासोबत फारसा वारा नसला तरीही आंब्याचा मोहोर गळाला. काही ठिकाणी कैऱ्यांचा सडाही पडला.  उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यात बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या गारांमुळे बहरात आलेली ज्वारी, गहू या पिकांसह द्राक्ष आणि आंबा फळपिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

परंडा व उस्मानाबाद तालुक्यात ज्वारीचा सर्वाधिक पेरा असून त्याचे सर्वाधिक नुकसान आहे. उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा, लासोना, समुद्रवाणी, घुगीसह परिसरात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अर्धा तास गारांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदेड जिल्ह्य़ातील कंधार, लोहा, मुखेड या तालुक्यांमध्ये दुपारी चार ते सहाच्या दरम्यान गारांसह पाऊस झाला. या जिल्ह्य़ातील पिकांचे नुकसानही अधिक आहे.

सोलापुरात अवकाळी पावसाची हजेरी

सोलापूर: सोलापूर व परिसरात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन सायंकाळी पंढरपूरसह मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या पाच तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला. सोलापूरात संध्याकाळनंतर गारपीटही सुरु झाल्याचे वृत्त आहे.  या पावसामुळे द्राक्ष बागांना फटका बसला असून ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. पंढरपूरमध्ये या पावसाने दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे.

रब्बी हंगामात शेतात उत्पादित झालेल्या ज्वारी पिकाची काढणी वेगाने सुरू आहे, गहू पिकाची कापणीही सुरू आहे. तसेच हरभराही काढला जात आहे. परंतु अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. यातच द्राक्ष बागांमध्ये तयार झालेली द्राक्षे काढली जात असताना हा अवकाळी पाऊस होऊन वादळी वारेही झाल्यामुळे याचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे. या पावसामुळे सामान्य शेतकऱ्यांसह द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे.

जिल्ह्य़ात सुमारे २५ हजार एकर क्षेत्रात द्राक्ष बागा अस्तित्वात आहेत. सध्या  या बागांमध्ये तयार झालेली द्राक्षे विक्रीसाठी काढली जात आहेत. यातच गेल्या काही दिवसांपासून तापमानवाढीचा फटका बसू नये म्हणून द्राक्ष बागांभोवती साडय़ांचा आधार देऊन सावली निर्माण केली जात आहे. परंतु यातच आता थेट ढगाळ वातावरण निर्माण होऊन पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे चेहरे चिंतेने ग्रासले आहेत.