घाटी रुग्णालयाच्या कणखर भूमिकेने केंद्रीय आरोग्य विभागाच्या खुलाशावर प्रश्नचिन्ह

औरंगाबाद : पीएम केअर निधीतून पुरविण्यात आलेल्या १५० कृत्रिम श्वसन यंत्रांपैकी  ज्योती सीएनसी कंपनीच्या अभियंत्यांनी ५८ व्हेंटिलेटर स्थापित केल्यानंतरही त्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील(घाटी) अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्यास ती निरुपयोगी ठरल्याची भूमिका घाटी प्रशासनाने पुन्हा एकदा जाहीर केली आहे. घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कानन येळीकर यांच्या स्वाक्षरीने व्हेंटिलेटर आल्यापासून ती स्थापित होणे आणि नादुरुस्तीचा सारा प्रवास नमूद असणारा खुलासा करण्यात आला आहे. या नव्या खुलाशामुळे प्रशासकीय यंत्रणावर ठपका ठेवत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या तपशिलावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.  दरम्यान अशी पुरवठा करण्यात आलेली सर्व यंत्रे नादुरुस्त नाहीत, अशी भूमिका आता भाजप नेते मांडू लागले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयास १२ एप्रिल रोजी १५० व्हेंटिलेटर देण्यात आले होते.  ज्योती सीएनसी कंपनीकडून पहिल्या टप्प्यात शंभर व्हेंटिलेटर देण्यात आले. त्यातील एक व्हेंटिलेटर स्थापित केल्यानंतर अतिगंभीर रुग्णांना त्याचा वापर करता येणार नाही, असे स्पष्ट झाले. मात्र साधारण गंभीर रुग्णांसाठी ते वापरता येतील, असे परीक्षणाअंती जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले. त्यानंतर १८ एप्रिल रोजी २५ व्हेंटिलेटर स्थापित करून देण्यात आली. पण एका दिवसात ही सर्व यंत्रे अयोग्य असल्याचे दिसून आले. रुग्णांना प्राणवायू घेण्यास या यंत्राचा उपयोग होत नव्हता. तसेच प्राणवायूचे प्रमाणही वाढत नव्हते. ही बाब कंपनीच्या अभियंत्याच्या कानी टाकूनही त्यांनी कोणताही सेवा अहवाल न देता ते निघून गेले.  २३ मे रोजी विभागीय आयुक्तांनी परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, बीड येथे  ५५ व्हेंटिलेटर वर्ग केले. कंपनीच्या अभियंत्यांना वारंवार संपर्क करूनही कोणी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर घाटीतील डॉक्टरांनी तपासणी करून व्हेंटिलेटरचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर कंपनीचे अभियंते राजेश रॉय आणि आशितोष गाडगीळ यांनी दोन व्हेंटिलेटर दुरुस्त केले. पण ते बंद पडले. या कंपनीने दिलेले बाकी व्हेंटिलेटर पडून असल्याचा अहवालही कंपनीच्या अभियंत्यास कळविण्यात आला परंतु त्यांनीही सेवा दिल्याचा कोणताही अहवाल न देताच ते निघून गेले. त्यानंतर २७ मे, १ मे आणि १० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रान्वये काही व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयास देण्यात आले.  अजूनही २७ व्हेंटिलेटर स्थापित होणे बाकी असल्याचे घाटी प्रशासनाच्या वतीने म्हटले आहे.  या नव्या खुलाशामुळे व्हेंटिलेटर पुरवठय़ाची प्रशासकीय अनागोंदी अधिक असल्याची केली जाणारी ओरड खोटी असल्याचे दिसून येत आहे.