राबून दिवसाला शंभर रुपये मिळणेही अवघड; ध्वजासाठी कापड बनवणाऱ्यांची व्यथा

स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस देशभर सणासारखे साजरे केले जातात. हा सण साजरा करताना स्वातंत्र्यासाठी खस्ता खाणाऱ्यांची आठवण केली जाते अन् दुसऱ्या दिवशी पुन्हा आपापल्या व्यापात सर्वजण गर्क असतात. या दिवशी राष्ट्रध्वजाला विविध ठिकाणी मानवंदना दिली जाते ते ध्वज बनविण्यासाठी कापड तयार करणाऱ्या लातूर जिल्ह्य़ातील उदगीरमधील कर्मचाऱ्यांना मात्र हलाखीचे जिणे जगावे लागत आहे.

राष्ट्रध्वजाकरिता लातूर जिल्हय़ातील उदगीर येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या कार्यालयातील महिला कर्मचारी वर्षांनुवष्रे हा कपडा तयार करतात. येथे तयार झालेला कपडा देशातील दर्जेदार कपडा समजला जातो.

उदगीरहून तो गुजरातमधील अहमदाबादला पाठविला जातो. तेथे या कपडय़ाची धुलाई व रंगाई होते. तेथून कपडा नांदेड येथील खादी ग्रामोद्योगमध्ये पाठवला जातो तेथे शिलाई व अशोक चक्रपट्टीचे काम होते. त्यानंतर मागणीनुसार ठिकठिकाणच्या प्रांतात विविध आकारात ध्वज पाठवले जातात. खादी ग्रामोद्योगाच्या स्थापनेपासून अतिशय कमी पशात कंत्राटी पद्धतीने काम करणारी मंडळी आहेत. गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या व्यवस्थापकपदाच्या व्यक्तीस सध्या महिना आठ हजार रुपये पगार मिळतो. त्यामुळे इतरांना मिळणारे मानधन हे त्यापेक्षा कमीच असते. आठ तास राबून महिना तीन हजार रुपयांपेक्षादेखील मिळणे कठीण होते.

खरेदीही बंद

उदगीर येथे सुमारे ७० महिला धागा तयार करणे, सूतकताई, विणाई अशी कामे करतात. त्यातील ८० टक्के महिला या साठी पार केलेल्या आहेत व त्यातील काही जणांनी तरी सत्तरी गाठली आहे. उदगीर विभागांतर्गत अहमदपूर, हडोळती, जळकोट, किनगाव या चार केंद्रांत सुमारे ८० कामगार सूतकताईचे काम करतात. लातूर जिल्ह्य़ातील औसा येथे कुर्ता, टॉवेल, सतरंजी तयार होते. सोलापूर जिल्ह्य़ातील अक्कलकोट येथे धोती तयार होते, तर नांदेड जिल्ह्य़ातील कंधार येथे सतरंजी, आसनपट्टी तयार केली जाते. खादीच्या विक्रीत तिपटीने वाढ झाली असल्याचा दावा शासनाच्या वतीने केला जातो आहे. पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने चतुर्थ व तृतीय श्रेणीच्या कामगारांसाठी खादी खरेदी केली जात असे. खादी खरेदी करणाऱ्यांना सवलत दिली जात असे. आता महाराष्ट्र शासनाने ही सवलतही बंद केली आहे व खरेदीही बंद केली आहे. उत्पादित झालेल्या मालाची पुरेशी विक्री होत नाही व मंडळाला नफा मिळत नाही या कारणासाठी कामगारांची उपासमार होते. वर्षांनुवष्रे काम करूनही किमान वेतनदेखील मिळत नाही. आरोग्याच्या सुविधा नाहीत.

उदगीर येथे काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रारंभी त्यांनी, ‘काही बोलायचे आहे पण बोलणार नाही’ अशी भूमिका घेतली. आमच्या व्यथा वर्षांनुवष्रे मांडल्या जातात, मात्र त्याचा पाठपुरावा होत नाही. वर्षांतून दोन वेळाच आमची आठवण येते अशी संतप्त भावना त्यांची आहे.

७० वर्षांच्या केवलबाई सोपान कांबळे गेल्या ४० वर्षांपासून येथे काम करतात. पाच मुले, पाच सुना, नातू असा मोठा परिवार. कोणालाही शासकीय नोकरी नाही, त्यामुळे केवलबाईंना स्वत:ची खळगी भरण्यासाठी या वयात रोज किमान आठ तास काम करावे लागते तरच कसेबसे १०० रुपये मिळतात.

साठवर्षीय ललिताबाई वाघमारे यांचीही कहाणी केवलबाईंसारखीच. वर्षांनुवष्रे आमचे रडगाणे सुरू आहे, मात्र ते ऐकायलाही कोणाला वेळ नसल्याचे त्या म्हणाल्या. विणाई विभागात काम करणाऱ्या नूरजहाँबी सय्यद या गेल्या ३५ वर्षांपासून खादीचे कापड तयार करण्याचे काम करतात. कंत्राटी पद्धतीचे हे काम असल्यामुळे ३० मीटरचे तीन गठ्ठे तयार केले तर १२६० रुपये मजुरी मिळते, मात्र हे तीन गठ्ठे तयार करण्यासाठी पंधरा दिवस किमान काम करावे लागते. महिनाभरात अडीच हजार रुपयांपेक्षा अधिक मजुरी मिळत नसल्याचे त्या म्हणाल्या. पतीचा मृत्यू झाला. या मिळकतीत पोटभर अन्नही मिळत नाही. गरिबांसाठी घरकुल योजना आहे असे सांगतात, मात्र ती कोणासाठी आहे? आम्ही मजुरी करायची की त्यासाठी हेलपाटे मारायचे? असा प्रश्न नूरजहाँबी यांनी उपस्थित केला.

गेल्या २० वर्षांपासून काम करणाऱ्या संगीता आवाळे यांना स्वत:चाच राग येत होता. आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांना दिवसाकाठी २५० रुपयांपेक्षा अधिक मजुरी मिळते. आम्ही मात्र आठ तास राबूनही १०० रुपयेच मिळतात. राष्ट्रध्वजाचा उदोउदो देशभर होतो. त्याचा आम्हाला काय फायदा? आमच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

धागा तयार करण्याचे काम करणाऱ्या रबीयाबी सय्यद म्हणाल्या, ४० वर्षांपूर्वी मी जेव्हा काम सुरू केले तेव्हा एक हजार मीटर लांब धागा तयार केल्यानंतर २५ पसे मजुरी मिळत असे. ४० वर्षांनंतर ती आता १ रुपया २० पसे झाली आहे. दिवसभर कितीही मेहनत केली तरी ६० ते ७० गुंडय़ा (एक हजार मीटरची एक गुंडी) इतकेच काम करता येते. हिशोबनीस म्हणून काम करणारे शेख अकबर गेल्या वीस वर्षांपासून काम करतात त्यांना केवळ ७९९५ रुपये इतका पगार मिळतो. शकुंतला साळुंके या १९८२ पासून हिशोबनीसाचे काम करतात त्यांनाही आता कुठे ८,३०० रुपये मासिक वेतन मिळते. शाखा व्यवस्थापक म्हणून काम करणारे भारत सोळुंके हे ३५ वर्षे सेवा करीत असले तरी त्यांना  केवळ आठ हजार रुपये मिळतात.

रापलेले चेहरे अन् हाडांचे सांगाडे

मराठवाडा खादी ग्रामोद्योगच्या आवारात काम करणाऱ्या महिलांकडे पाहिले तर मन हेलावते. ज्या वयात नातवाच्या हातून पाय चेपून घ्यायचे त्या वयात दिवसभर खादीचे कापड विणण्यासाठी पायडल मारावे लागतात. संपूर्ण चेहरे सुरकुतलेले. अंगावर मांसाचा लवलेश नाही. केवळ हाडांचा सांगाडाच आहे की काय? असा प्रश्न पडावा. ज्या परिसरात खादी ग्रामोद्योगची इमारत चार एकर जागेवर उभी आहे त्या नई अबादी भागात महाविद्यालय, नगराध्यक्ष, आमदार, उद्योजक अशा मंडळींच्या टोलेजंग इमारती आहेत. खादी ग्रामोद्योगचा परिसर मात्र कळा खातो आहे. शाखा व्यवस्थापक व पर्यवेक्षकांसाठी बांधलेले निवासस्थानही आज जीर्ण झाले आहे. कुठलाही भाग केव्हाही कोसळेल अशी स्थिती असतानाही अन्य ठिकाणी राहणे परवडत नाही म्हणून त्यांना तेथेच राहावे लागते.