लातूर शहराला नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा महापालिकेने बंद करून टँकरद्वारे सुरू केला होता. मात्र, पाणीपुरवठय़ासंबंधी आयोजित बठकीत अनेक नागरिकांनी पाणी थोडे कमी द्या, मात्र नळाद्वारेच द्या अशी मागणी केली. या मागणीनंतर प्रशासनाने नियोजन करून रविवारपासून (दि. ७) १५ दिवसातून एकदा पाणी देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग व महापौर अख्तर शेख यांनी दिली.
शहरात पाण्याची मोठी गळती असल्यामुळे नळाद्वारे पाणी देणे अडचणीचे जात होते. शहराच्या विविध भागात मुख्य जलवाहिनीवरील सुमारे ८०० जोडण्या महापालिकेने तोडल्या आहेत. बार्शी रस्त्यावरील मुख्य जलवाहिनीवरून महापालिकेनेच काही व्यावसायिकांना जोडण्या दिल्या. त्यांना पालिकेने नोटीस पाठवून पिण्यासाठी पाणी देणे आवश्यक असल्यामुळे आपली जोडणी दोन दिवसांत बंद करण्यात येणार आहे. पर्यायी व्यवस्था तुम्ही करा, असे कळवले आहे. या जोडण्या पूर्ण बंद झाल्यास जलवाहिनीवरील ताण कमी होणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणात सध्या केवळ ०.५० दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. शहरासाठी दररोज ८ एमएलडी पाणी धनेगाव धरणातून उचलल्यास धनेगाव धरणातील पाणीसाठा महिनाभर पुरू शकतो. पहिल्या टप्प्यात सलग १५ दिवस हे पाणी उचलून नळाद्वारे दिले जाणार आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात पाणी देण्यासाठी पालिकेने साई बंधाऱ्यावर जे चर खोदण्याचे काम सुरू केले आहे. सध्या ३ एमएलडी पाणी उपलब्ध आहे. १५ दिवसात चर मोठा केल्यानंतर ५ एमएलडी पाणीसाठा उपलब्ध होईल. भूजल सर्वेक्षण विभागाने शहराच्या विविध भागात िवधनविहिरी घेण्यासाठी सूचित केले आहे. त्या २० िवधनविहिरीतून दररोज २ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे.
नंतरच्या पंधरवडय़ात साई बंधाऱ्यातून ४ एमएलडी व धनेगाव धरणातून ४ एमएलडी पाणी उचलले जाणार आहे. धनेगाव धरणातील पाणी पूर्ण संपल्यानंतर धरणात मोठा चर खोदण्याचे काम सुरू केले जाईल. भूजल विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या चर खोदणीनंतर दररोज १० एमएलडी पाणी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर पाणी कमी पडले तर भंडारवाडी धरणात २ दलघमी पाणी शिल्लक आहे. भंडारवाडीवरून आर्वी बूस्टर पंपापर्यंत २२ किलोमीटरचे अंतर आहे. दररोज २४ हजार लिटरचे ४० टँकर पाणी आणल्यास ४ एमएलडी पाण्याचा उपसा होईल व ते पाणी नळाद्वारे दिले जाईल.
एप्रिल, मे महिन्यात फारच अडचण निर्माण झाली तर माकणी धरणातील ४ एमएलडी पाणी लातूरसाठी आरक्षित करण्यात आले आहे. बेलकुंड येथून लातूरच्या पंपापर्यंतचे अंतर २५ किलोमीटर आहे. भंडारवाडीचा पाणीसाठा संपल्यानंतर तेथून दररोज ४० टँकरने पाणी आणून ते बूस्टर पंपात टाकले जाईल व नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. सध्या टँकरने पाणी देताना प्रत्येक कुटुंबाला केवळ २०० लिटर पाणी दिले जात असल्यामुळे नागरिकांची मोठी गरसोय होत होती. नळाद्वारे १५ दिवसाला १ हजार लिटर पाणी आले तरी समन्यायाने पाण्याचे वाटप होणार आहे. अर्थात, हे पाणी केवळ पिण्यासाठीच राहणार आहे. वापरण्यासाठीच्या पाण्यासाठी प्रत्येक कुटुंबीयांना वेगळी व्यवस्था करावी लागणार आहे.
शहरातील ज्या १० टक्के भागात पाणी देण्यासाठी उर्वरित ९० टक्के भागात अधिक वेळ सोडले जात होते. त्यामुळे पाणी वाया जात होते. या १० टक्के मंडळींना मात्र पूर्ण टँकरने पाणी पुरवले जाणार आहे. याशिवाय सध्या प्रत्येक प्रभागासाठी एक टँकर उपलब्ध आहे. तो तसाच चालू राहील. गरजेनुसार प्रत्येक प्रभागासाठी दररोज दोन टँकर उपलब्ध केले जाणार आहेत. याशिवाय प्रत्येक प्रभागातील ज्या खासगी िवधनविहिरीला पाणी चांगले आहे, अशा तीन िवधनविहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे व तेथून पाण्याचा उपसा करून परिसरातील लोकांना दिले जाणार आहे. याशिवाय महापालिकेच्या मालकीच्या ज्या िवधनविहिरी आहेत त्यातील ४० टक्के चालू आहेत त्याद्वारेही नागरिकांना पाणी दिले जाणार आहे.
सरकारने टँकरसाठी पसे देण्याची गरज
टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकार महापालिकांना एकही पसा देत नाही. लातूरची विशेष बाब लक्षात घेऊन सरकारने पसे देण्याची गरज आहे. संपूर्ण उन्हाळाभर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी किमान १० कोटी रुपये लागणार आहेत. सध्या महापालिका स्वनिधीतून हा खर्च करते आहे. नळाला पाणी दिले जात नाही, या कारणाने पाणीपट्टी वसूल होत नाही व सरकारनेही पसे न दिल्यास अडचण निर्माण होईल, त्यामुळे सरकारने तातडीने पसे देण्याची गरज आहे.
दुहेरी नळधारकांवर दंडात्मक कारवाई
लातुरात बऱ्याच वर्षांपासून विनापरवाना राज आहे. अनेक कुटुंबीयांकडे दोनपेक्षा अधिक नळजोडण्या आहेत. तरीही ही मंडळी पाणीपट्टी भरत नाही. शिवाय पाण्यासाठी ओरड करण्यात पुढे असतात. पालिकेने ज्या घरात एकापेक्षा अधिक जोडणी आढळून येईल त्यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. ज्यांच्याकडे अशी जोडणी आहे त्यांनी तातडीने ती बंद करून १० फेब्रुवारीपूर्वी पालिकेस कळवल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. मात्र, त्यानंतर कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी स्पष्ट केले.