मोबाइलवरील लुडो खेळातील जय-पराजयानंतरच्या पैशांच्या देवाण-घेवाणीवरून एका चौदा वर्षीय मुलाचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. कन्नड तालुक्यातील गुदमा येथील जंगलात शुक्रवारी सकाळी मृतदेह सापडल्यानंतर घटना समोर आली.

कौतिक नारायण राठोड असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका चौदा वर्षीय विधिसंघर्षग्रस्त मुलास ताब्यात घेतले आहे, तर राहुल सुखराम जाधव (वय २२, ह. मु. बुधमा तांडा) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हे दोघेही नात्याने भाऊ असल्याची माहिती कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील नेवासे यांनी दिली.

मृत कौतिक राठोड हा काही मित्रांसह गावाजवळील जंगलात जनावरे चारण्यासाठी गेला होता. तेथे अन्य काही मुलेही जनावरे चारण्यासाठी आली होती. ही सर्व मुले मोबाइलवर लुडो खेळ खेळत होती. त्यात मृत कौशिक राठोड, आरोपी राहुल जाधव व त्याचा लहान भाऊ हे दोघेही होते. त्यांच्यामध्ये खेळातील जय-पराजयातील पैशांवरून वाद झाला. त्यातूनच कौतिक राठोडचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. कौतिकचा मृतदेह तेथेच टाकून खून करणारा राहुल जाधव व त्याचा लहान भाऊ हे दोघे दुचाकीवरून धुळे जिल्ह्य़ाच्या शिरपूर तालुक्यातील मूळ गावाकडे पसार झाले.

शुक्रवारी सकाळी कौतिकचा मृतदेह जंगलात काही ग्रामस्थांना आढळून आला. याची माहिती कन्नड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेहाच्या अंगावरील जखमांवरून कौतिकचा खून झाला असण्याचा अंदाज बांधला. त्यावरून पोलिसांनी सूत्रे फिरवून राहुल सुखराम जाधव व त्याचा चौदा वर्षीय भाऊ, विधिसंघर्षग्रस्त बालकाला धुळे जिल्ह्य़ात पकडण्यात आले. आरोपी राहुल जाधव व त्याचे कुटुंबीय हे कामासाठी कन्नड तालुक्यातील बुधमा तांडा या भागात आलेले आहेत. ते मूळचे धुळे जिल्ह्य़ाच्या शिरपूर तालुक्यातील आहेत, असे पोलीस निरीक्षक सुनील नेवासे यांनी सांगितले.

लुडो खेळाचे लोण ग्रामीण भागात

मोबाइलवरील लुडो खेळाचे लोण ग्रामीण भागातील गाव-वस्ती-तांडय़ापर्यंत पोहोचले आहे. विशेषत: तरुण पिढी, मुलेही या खेळाच्या आहारी गेले असून त्यातूनच खुनासारख्या घटना घडत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.