छत्रपती संभाजीनगर – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पेट्रोलपंपांनंतर भव्य १६ उपहारगृहे (फुड माॅल) उभारण्यात येणार आहेत. समृद्धीवर प्रवाशी-वाहनचालकांसाठी जेवण-पाण्याशी संबंधित कुठलीही व्यवस्था नसून, न्यायालयाकडूनही यासंदर्भाने विचारणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भव्य उपहारगृहे उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत.
समृद्धीवर ठाण्याकडून नागपूरच्या दिशेने करण्यात येणाऱ्या मार्गात सात ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये नाशिकजवळ, डवला (छ. संभाजीनगर), मांडवा आणि डोणगाव (बुलढाणा), शिवणी (अमरावती), रेणकापूर-माणकापूर (वर्धा) व वाईफल (नागपूर). तर नागपूरहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गात ११ पेट्रोलपंप सुरू आहेत. त्यामध्ये वाईफल (नागपूर), गणेशपूर व शिवणी (वर्धा), ताथोड आखतवाडा (वाशिम), डोणगाव, मांडवा (बुलढाणा), कडवंची (जालना), पोखरी, अनंतापूर (छ. संभाजीनगर) व मरळ (नाशिक) सुरू असून, दाव्हा आणि फतियाबाद येथेही दोन पेट्रोलपंप प्रस्तावित असल्याची माहिती एमएसआरडीसी कार्यालयाकडून मिळाली.
उपरोक्त १६ पेट्रोलपंपाजवळच मुंबई-पुणे महामार्गाच्या धर्तीवर भव्य उपहारगृहे उभारण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत एका फुडमाॅलसाठी प्रस्ताव आलेला असून, उर्वरीतसाठीही प्रक्रिया गतिमान झाली आहे. समृद्धी महामार्गावर दररोज हजारोंच्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असली तरी प्रवाशी आणि वाहनचालकांना विसावा घेऊन जेवणासाठीची व्यवस्था नसल्याचा एक प्रश्न निर्माण झाला होता.
कशी असतील उपहारगृहे
समृद्धी महामार्गावरील संभाव्य भव्य १६ उपहारगृहांच्या भागात किमान ५० चारचाकी वाहने थांबतील, एवढी विस्तीर्ण वाहनतळाची जागा. मुलांसाठी खेळणी, महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, महिला, बचतगटात तयार होणारे वाळवणासारखे खाद्यपदार्थ, कलाकुसरीतील निर्मित वस्तु, चहापासून शाखाहरी, मांसाहारी जेवणासह हलक्या-फुलक्या नाश्त्यापर्यंची व शीतपेयापासून आईसक्रीम ठेल्याची व्यवस्था असेल.
मुंबई मार्गाच्या धर्तीवर समृद्धी महामार्गावरही फुड माॅल उभारण्याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. १६ पेट्रोलपंपाशेजारीच हे फुडमाॅल उभारण्यासाठी प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे.- प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी, एमएसआरडीसी.