परभणीत ६ कोटी रुपयांचा धान्य घोटाळा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परभणी येथील धान्य गोदामांच्या तपासणीत तब्बल १३ हजार ८४१ क्विंटल गहू आणि ५ हजार ३०० पोते तांदूळ कमी आढळून आल्याने तहसीलदार संतोष रुईकर यांना निलंबित करण्यात आले. विभागीय आयुक्तांनी हा निर्णय घेतला. तसेच पुरवठा अधिकारी दिलीप कच्छवे यांची बदली करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. परभणी जिल्हय़ातील हा धान्य घोटाळा ५ कोटी ९७ लाख ६९ हजार ९२९ रुपयांचा असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. एकाच तालुक्यातील या घोटाळय़ामुळे मराठवाडय़ातील ७० गोदामांची तपासणी लवकरच केली जाणार आहे.

परभणी येथील धान्य गोदामांची तपासणी केल्यानंतर साठा नोंदवहीतील शिल्लक आणि प्रत्यक्ष साठा यात कमालीची तफावत आढळून आली. गहू आणि तांदूळ या धान्याची पोतीच्या पोती काळय़ा बाजारात विकली गेली असावीत, असा प्रशासनाचा अंदाज आहे. कोटय़वधी रुपयांचा हा घोटाळा उघडकीस आल्याने नायब तहसीलदार सी. बी. पांचाळ यांना काही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर गोदामाची तपासणी केली असता ३ कोटी २४ लाख ५५ हजार ८३१ रुपयांचा गहू आणि १ कोटी ७३ लाख १४ हजार ९८ रुपयांचा तांदूळ दिसून आला नाही. प्रत्यक्षात साठा नसल्यामुळे या प्रकरणात परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार व जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला जाणार आहे. संतोष रुईकर यांचा या घोटाळय़ातील सहभाग कितपत आहे, त्यांची भूमिका काय, याची विभागीय चौकशी केली जाणार असून तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

 

परभणीचा धान्य घोटाळा; दोन स्वस्त धान्य दुकानदारांना अटक

परभणी : येथील पुरवठा विभागाच्या तीन गोदामांमधील पाच कोटी रुपयांच्या धान्य घोटाळय़ात शुक्रवारी आणखी दोन स्वस्त धान्य दुकानदारांना पोलिसांनी अटक केली. पिंगळी येथील पांडुरंग रामराव सावंत व परभणीतील प्रदीप वसंतराव दमकोंडवार अशी या दोघांची नावे असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवापर्यंत (दि. २९) पोलीस कोठडी सुनावली. तसेच गोदामपाल व मुकादम यांच्या पोलीस कोठडीतही दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आजपर्यंत या धान्य घोटाळय़ात सहा आरोपींना अटक झालेली आहे.

पाच कोटींच्या धान्य घोटाळय़ात कच्छवे यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गोदामपाल आंबेराव व मुकादम महेबूब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

आज या दोघांची पोलीस कोठडी संपल्यामुळे तिसऱ्यांदा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पुन्हा या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली, तर या धान्य घोटाळय़ात काल वसंत देशमुख व पवन बनसोडे यांना अटक झाली होती. या धान्य घोटाळय़ाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाकोणाची नावे समोर येतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

पुरवठा विभागाला लागलेली कीड समूळ नष्ट करण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाचे सूत्रधार मोकाट राहू नयेत, अशीही जनतेत भावना व्यक्त होत आहे.

तहसीलदार रुईकरांची वादग्रस्त कारकीर्द

निलंबित करण्यात आलेले तहसीलदार संतोष रुईकर यांची परभणीतील कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. पुरवठा विभागातील धान्य घोटाळय़ाबरोबरच परभणी तालुक्यात वाळूची साठेबाजी करणाऱ्यांची त्यांनी पाठराखण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वाळू ठेकेदारांना अभय दिल्यामुळे शासनाचा सव्वा कोटी रुपयांचा महसूल बुडाला. यात रुईकर हेच प्रामुख्याने जबाबदार आहेत. वाळू ठेकेदारांना अभय आणि धान्य घोटाळय़ातील ठपका यामुळे रुईकर यांची कारकीर्द वादग्रस्त आणि कलंकित बनली आहे.

परभणी येथील पुरवठा विभागाच्या तीन गोदामांची १ ते ९ ऑगस्ट दरम्यान मुंबई येथील पथकाने तपासणी केली होती. या गोदामातून १९ हजार १४१ क्विंटल गहू व तांदूळ गायब असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले.

रहीमनगरमध्ये सापडला स्वस्त धान्याचा साठा

येथील नवा मोंढा पोलीस ठाणे हद्दीतील रहीमनगर येथे स्वस्त धान्य दुकानाचा गहू, तांदूळ व साखरेचा साठा सापडल्याने दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या स्वस्त धान्याची तहसीलदार भगत यांनी तपासणी करून सर्व माल शासकीय गोदामामध्ये ठेवण्याचे आदेश दिले. रहीमनगर येथील घरात टाकलेल्या छाप्यात तांदळाच्या ६१ पोते ज्यावर हरयाणा कॉपरेरशनचा शिक्का आहे. २०१६-१७ मधील व भरवनाथ शुगर वर्क्‍स लिमिटेड-बिहार असे लिहिलेले एकूण १०२ बॅगा पोलिसांनी जप्त केल्या. या धान्याची किंमत १ लाख ४० रुपये असून, सार्वजनिक वितरणाचा माल ताब्यात बाळगला या प्रकरणी दोन आरोपींविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार पोलीस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांच्या तक्रारीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 

 

 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 crore rs food scam in parbhani district
First published on: 27-08-2016 at 01:55 IST