छत्रपती संभाजीनगर : एरवी फक्त भगव्या रंगात असणाऱ्या फलकाचा पृष्ठभाग आता पांढऱ्या रंगात झालेला. बाहेरच्या फलकावर चंद्रकात खैरे यांचे नाव ‘निळ्या’ रंगात आणि प्रचार कार्यालयाच्या आतल्या फलकावरील नावाचा रंग ‘हिरवा’. मध्यवर्ती प्रचार कार्यालयातील रंग भगवा दिसत असला तरी कार्यालयाच्या वरच्या बाजूला शरद पवार गटाची तुतारी, निळा झेंडा, काँग्रेसचा तिरंग्यावरील हात चिन्ह असणारा ध्वज फडकत होता. समाजवादी नेते सुभाष लोमटे, माकपचे अभय टाकसाळ यांच्यासह पुरोगामी विचारधारा पुढे नेणाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन झाले.

शिवसैनिकांबरोबर काँग्रेसचा हात चिन्हाची निशाणी असणाऱ्या महिला प्रचार कार्यालयात पुढच्या बाजूला बसल्या होत्या. काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल पटेल म्हणाले, खैरे हे सगळयांचे उमेदवार आहेत. आता समोरच्याची खैर नाही. भाजप हे उल्लू बनविण्याचे मशीन आहे.

हेही वाचा >>>चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन

आता भाजपमध्ये भाजपचे कुठे आहेत. १६६ उमेदवार आयात केलेले आहेत.’ पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने अंकुशराव कदम यांनी खैरे यांना शुभेच्छा दिल्या. समाजवादी नेते सुभाष लोमटे यांनी ‘विचारांच्या पातळीवर विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात जो उभा आहे त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत’ असे सांगितले. युसुफ मुखाती म्हणाले, ‘आम्ही खांद्याला खांदा देऊन लढू.

आघाडीची एकजूट

शिवसेनेकडून चार जणांची भाषणे झाली. त्यात कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी थोडक्यात मत व्यक्त करत आम्ही कन्नड तालुक्यातून अधिक मतदान करू असे सांगितले. अंबादास दानवे आणि संजय राऊत यांची प्रमूख भाषणे झाली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे आवर्जून घेत होते. संजय राऊत बोलताना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष झाला. अनेक मुस्लीम तरुण पहिल्यांदाच शिवसेनेच्या कार्यालयात आले होते. त्यातील शामियोद्दीन काझी यांना विचारले असता ते म्हणाले, देश माहोल ऐसा है की बदलना पडता है. मै पहिली बार यहा आया हूँ।’