बीड जिल्ह्यातील पालवण येथे वृक्षसंमेलन * अभिनेते सयाजी शिंदे व लेखक अरविंद जगताप यांचा पुढाकार

औरंगाबाद : झाड म्हणजे श्वास. ते मनात रुजायला हवे. त्याचे गुण गाऊ, त्याचे गुण घेऊ, असे व्हायला हवे. म्हणजे सावली देताना झाड कधी भेदभाव करीत नाही. सुगंध, पाने, फूल, फळ सारे काही देत राहते. झाडे लावण्याचे कार्यक्रम खूप पण झाड जगायला हवे यासाठी प्रयत्न कसे करायचे? नुसते बोलून काही होत नाही. ‘गोष्ट एवढी डोंगरासारखी’ हा चित्रपट केला त्यानंतर नुसते दाखवून काही होणार नाही, असे सतत जाणवत होते. म्हणूनच झाडे लावायचे ठरविले आणि आता ज्या भागात केवळ चार टक्के वनक्षेत्र आहे अशा मराठवाडय़ात पहिल्यांदा वृक्ष संमेलन घेण्याचा निर्णय सिनेअभिनेते सयाजी शिंदे आणि लेखक अरविंद जगताप यांच्या पुढाकाराने अमलात आणला जात आहे. बीड शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील पालवणच्या डोंगरावर १३ व १४ फेब्रुवारी रोजी वृक्ष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. झाड मनात रुजायला हवे म्हणून हा प्रयत्न असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप यांनी सांगितले.

तशी बरीच संमेलने होतात. साहित्य संमेलन, कविसंमेलन गावोगावी होते. पण वृक्ष संमेलन आपण घेत नाही. खरे तर जे झाड कार्बनडाय ऑक्साईड घेते आणि ऑक्सिजन देते. एका अर्थाने ते माणसासाठीच काम करते. आपण मात्र त्या झाडाच्या मयतावर उठलो आहोत. झाडे लावायला हवीत, वाढवायला हवीत म्हणून बीड शहरापासून जवळ असणाऱ्या पालवणच्या डोंगरावर आता दीड लाख झाडे लावली आहेत. काही छोटी आहेत, काही मोठी. प्रत्येक बीज रुजतेच असे नाही. काही झाडे मरून गेली. पण झाडे वाढविण्याची सवय लागायला हवी. पालवणच्या डोंगरात ‘सह्यद्री देवराई’च्या वतीने करण्यात आलेला प्रयोग गावोगावी व्हावा, यासाठी झाड मनात रुजविण्याचा प्रयत्न म्हणून या संमेलनाकडे पहावे, असे आवाहन सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप यांनी पत्रकार बैठकीत केले. गावागावातील विद्यार्थी आणि झाडावर प्रेम करणारी माणसे एकत्र यायला हवी, त्यांनी हे काम आपापल्या गावात करावे म्हणून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. झाडांवर प्रेम करा हा संदेश नीटपणे जावा म्हणून ‘व्हॅलेंटाईन-डे’ साजरी करण्याची अनोखी पद्धत पुढे चालून रुजावी म्हणून याच दिवशी हा कार्यक्रम करावा असाही उद्देश असल्याचे लेखक अरविंद जगताप यांनी सांगितले.

झाडांची गाणी, झाडांच्या गोष्टी यावर चर्चा व्हावी तसेच बीड परिसरातील वनस्पतींची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून स्थानिक छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार असून या परिसरात जिल्ह्यातील शाळांची सहलही त्यादिवशी संमेलन स्थळी आयोजित करण्यात येणार आहे. वड, पिंपळ, उंबर अशा देशी वाणांची झाडे अधिक लावली तर दुष्काळावर मात करता येते. मात्र, त्यासाठी झाडे जपावी लागतात. ती रुजवणूक मनात व्हावी म्हणून वृक्ष संमेलन घेत असल्याचे सांगण्यात आले. या मेळाव्यास विविध क्षेत्रातील मान्यवरही सहभागी होणार आहेत. पण कोणी प्रमुख पाहुणा असणार नाही. भाषणबाजी ऐवजी झाडे लावून ते जगावीत, यासाठी काय करायला हवे याविषयावर भर असेल व असे कार्यक्रमाचे स्वरुप असेल असे जगताप यांनी सांगितले. या संमेलनास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उपायुक्त शिवानंद टाकसाळे यांनी मराठवाडय़ात अशा प्रकारच्या उपक्रमाची गरज असल्याचेही व संमेलनासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे पत्रकार बैठकीत सांगितले.