मुंबई येथील राहत फतेअली खान यांच्या कार्यक्रमास युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती, असे पत्रक काढल्याचा समाचार घेत आदित्य ठाकरे यांनी आम आदमी पक्षावर बदनामीचा दावा ठोकणार असल्याचे शुक्रवारी येथे सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेचा शेतकरी मेळावा झाला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अन्नधान्य वितरण व १८ योजनांच्या लोकवाटय़ाची ६५ लाख रुपयांची रक्कम त्यांच्या हस्ते लाभार्थीना देण्यात आली. पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल आदींची उपस्थिती होती.
पाकिस्तानी कलाकारांना सादरीकरण करण्यास शिवसेना यापुढेही विरोध करणार असल्याची भूमिका या वेळी व्यक्त करण्यात आली. पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी रविवारी (दि. ११) पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमास शिवसेना उपस्थित राहणार का, या प्रश्नावर ‘कोणी कोठे जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवसेनेने अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका घेतली आहे. आम्हाला शेतकरी महत्त्वाचे आहेत’ असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दुष्काळग्रस्तांसाठी सेनेकडून सुरू असलेल्या मदतीची माहिती पालकमंत्री कदम यांनी दिली. अन्न-धान्य वितरण कार्यक्रमाचे सर्व श्रेय माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांचे असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. खासदार खैरे यांचा त्यांनी टाळलेला उल्लेख मात्र भुवया उंचावायला लावणारा होता. युवा सेनेचे पदाधिकारी आदित्य ठाकरे यांच्यासमवेत उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2015 रोजी प्रकाशित
आदित्य ठाकरेंच्या हस्ते दुष्काळग्रस्तांना ६५ लाखांचे वाटप
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १८ योजनांच्या लोकवाटय़ाची ६५ लाख रुपयांची रक्कम आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लाभार्थीना देण्यात आली.
Written by दया ठोंबरे
First published on: 10-10-2015 at 01:55 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray