scorecardresearch

वैद्यकीय प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे कर्करुग्णांसह ५० शस्त्रक्रिया रखडल्या

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व विभाग आणि प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम झाला.

औरंगाबाद : औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व विभाग आणि प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम झाला. कर्करुग्णांवर करण्यात येणाऱ्या १० शस्त्रक्रिया होऊ शकल्या नाहीत. घाटीतील इतरही ४० शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून या आंदोलनामुळे १४ फेब्रुवारीपासून एमबीबीएस व एमडीच्या विद्यार्थ्यांचे कुठलेही शिक्षण होऊ शकले नाही, असेही वैद्यकीय विभागातील प्राध्यापकांनी सांगितले.

घाटी परिसरात सुरू केलेल्या आंदोलनात सोमवारी २०० प्राध्यापक, डॉक्टर सहभागी झाले होते. आंदोलनामुळे घाटीतील बाह्य विभागात सोमवारी केवळ तरुण डॉक्टरांकडूनच रुग्णांची तपासणी करण्यात येत होती. ज्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे, त्याबाबत वरिष्ठ पातळीवरून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांसोबत बैठक सायंकाळी घेतली जाणार असून त्यामध्ये काय चर्चा होते त्यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे घाटीतील महाराष्ट्र स्टेट मेडिकल टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.

१४ मार्चपासून वैद्यकीय विभागातील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा संघटनेकडून इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. अस्थायी सहायक प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी यापूर्वीही वेळोवेळी आंदोलन करण्यात आले आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घेतलेल्या एका बैठकीत सेवेत कायम करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर प्राध्यापकांनी महामारीच्या काळात करोना योद्धे म्हणून दिवसरात्र काम केले. या सर्व कामाकडे आणि मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष वेधण्यासाठी एप्रिल २०२१ मध्ये आंदोलन करण्यात आले. त्या वेळी मंत्री देशमुख यांनी आठ दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. पुन्हा डिसेंबरमध्ये आंदोलनाची माहिती देण्यात आली होती.

जानेवारीपासून आतापर्यंत तीनवेळा आंदोलने केली. करोनाची तिसरी लाट येऊन गेल्यानंतरही शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात आणि मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व अस्थायी सहायक प्राध्यापकांनी कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी बहिष्कार टाकण्याचे आंदोलन करण्यात आले असून त्यामुळे रुग्णसेवा ठप्प झाली होती. कर्करुग्णांवरील १० तर इतर मिळून ५० शस्त्रक्रिया थांबल्या व इतरही सेवेवर परिणाम झाला. एमबीबीएसचे, एमडीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण महिनाभरापासून थांबल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Agitation medical professors surgeries including cancer patients delayed ysh

ताज्या बातम्या