छत्रपती संभाजीनगर : विमानतळाच्या परिसरात १५ किलोमीटरच्या परिघात लेझर लाईट्स लावण्यास मनाई करणारा आदेश प्रभारी पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी काढला आहे. लेझर, बीम लाईट्समुळे विमानाच्या उतरतेवेळी व उड्डाणाच्यावेळी पायलटच्या दृष्टीवर गंभीर परिणाम होऊन एखादी गंभीर हवाई वाहतूक दुर्घटना घडू शकते. शिवाय विमानातील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असे मनाई आदेशात म्हटले आहे.

प्रभारी पोलीस आयुक्त हिरेमठ यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय विमानपतन प्राधिकरणाने निदर्शनास आणून दिल्यानुसार विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक फार्म हाऊस, मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळे आणि विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रम सण, उत्सवामध्ये लेझर लाईट्स, बीम लाईट्स वापरतात. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. अशा कार्यक्रमाच्या वेळेस आकाशामध्ये प्रखर लेझर लाईट्स, बीम लाईट्सचा वापर करण्यात येतो. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये पोलीस आयुक्त यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कलम १६३ चे विशेष अधिकार प्रदान केलेले असून, त्या आधारे उपरोक्त मनाई आदेश देण्यात येत असून, छत्रपती संभाजीनगर विमानतळच्या साधारणपणे १५ कि.मी. अंतराच्या वायुक्षेत्र परिघामध्ये व छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात नमूद कृत्यावर प्रतिबंध करण्यात येत आहे. ९ नोव्हेंबर ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीपर्यंत वरील आदेश राहतील. या संदर्भातील सुधारित आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात म्हटले आहे.