छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपूर्वी म्हणजे दसऱ्यापर्यंत अतिवृष्टीची मदत देण्याच्या हालचाली सरकारदरबारी सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले. त्याचबरोबर आपणास उमेदवारी देण्यासाठी दिल्लीला जावे लागत नाही. त्यामुळे आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो, असे होऊ दिले जाणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केले. चार दशके शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या शिवाजी चोथे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशानंतर कार्यकर्त्यांशी ते बोलत होते.

ते म्हणाले. ‘सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. बघता बघता निवडणूक येईल. आता वेळ कमी आहे. याच काळात अतिवृष्टीचेही संकट आले आहे. पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अनेक ठिकाणी पिके पाण्यात गेली आहेत. कांद्याचा वांदा झाला आहे. अशा स्थितीमध्ये दसऱ्याच्या आत मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. काही भागांत घरे पाण्याखाली गेली आहेत. अनेक जनावरे दगावली आहेत. शेतकरी संकटात आहे. त्यांना शासनाकडून मदत केली जाईल. जिथे महसूल आणि कृषीचे कर्मचारी कमी पडतील ती बाब कार्यकर्त्यांनी लक्षात आणून द्यावी, त्याची सोडवणूक करण्याच्या सूचना आपण देऊ असेही पवार म्हणाले.

तिकीट मागायला मला दिल्लीला जावे लागत नाही

शिवाजी चोथे यांच्याबरोबर आलेल्यांना वाटेल, या तालुक्यातून पुन्हा कोणी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आला तर यांचे काय होईल असे वाटू देऊ नका. मला तिकीट मागायला दिल्लीला जावे लागत नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला. हा टोला नक्की सत्ताधारी मित्रपक्षातील भाजपला की शिवसेनेला याची चर्चा कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.