नगरपालिका निवडणुकीनंतर काही ठिकाणी मिळालेल्या अपयशामुळे एमआयएमची कोअर कमेटी बरखास्त करण्याचा विचार पक्षाचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसी करीत आहेत. जालना, परभणी, लातूर जिल्हय़ातून पक्षाला खूप अपेक्षा होत्या. नगरसेवक निवडून आले असले तरी पुरेसे यश पदरी पडले नसल्याने संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. मराठवाडय़ात मात्र पक्षाचा प्रभाव वाढत असला तरी यश पदरी पडले नाही. बीड, अर्धापूर, कन्नडमध्ये उमेदवारांनी घेतलेली मते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात धडकी भरायला लावणारी ठरली असल्याचा दावा औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

राज्यात नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाने १७० उमेदवार रिंगणात उतविले होते. वेगवेगळय़ा ठिकाणी पक्षाचे ४६ नगरसेवक निवडून आले आहेत. या पक्षाचा प्रभाव वाढत असला तरी नगराध्यक्ष निवडून आणण्यापर्यंतचे यश खेचता आले नसल्याचे चित्र दिसून येत आहे. बीड नगरपालिकेत  एमआयएमचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातील काहींची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. हाफीज मोमीन अजहर हे तर भाजी विक्रेते आहेत. प्रतिसाद वाढतो आहे. पण पुरेसे यश मिळत नसल्याची कबुली आमदार इम्तियाज जलील यांनी दिली. तसे निकालावर आम्ही समाधानी असलो तरी काही ठिकाणी प्रयत्न करण्याची आवश्यकता होती. म्हणूनच काही बदल तातडीने केले जात आहेत.

लातूरचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद अली यांना बदलून आता जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी उदगीरच्या सय्यद ताहेर यांच्याकडे देण्यात आली आहे. खरे तर जालना जिल्हय़ातूनही अधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता होती. अ‍ॅड. असदोद्दीन ओवेसी यांच्या सभेला झालेली गर्दी लक्षात घेता अधिक मते मिळतील, असे अपेक्षित होते. मात्र, काही जिल्हय़ातील प्रभारी नेत्यांना पुरेसे यश मिळविता आले नाही. जालना जिल्हय़ाची जबाबदारी डॉ. गफ्फार कादरी यांच्यावर होती. तसेच परभणीची जबाबदारी मौलाना महेफूज रेहमान यांच्यावर होती. हे दोघेही कोअर कमेटीचे सदस्य आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही फारसा प्रभाव राहू शकला नाही. येथील जबाबदारी अंजून इनामदार यांच्याकडे होती. त्यामुळे कोअर कमेटीच बरखास्त करण्याची नेतृत्वाची मानसिकता असल्याचे सांगण्यात येते. जलील यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

बीड, कन्नड, अर्धापूर, उदगीर या नगरपालिकांमध्ये एमआयएमचे उमेदवार दुसऱ्या  व तिसऱ्या क्रमांकावर राहिले. कोणत्याही बडय़ा नेत्याची सभा न घेता नंदुरबार जिल्हय़ात पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले. मालेगावमध्येही चार नगरसेवक निवडून आले आहेत. परिणामी पक्षाची ताकद वाढते आहे. याचा धसका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही लढवाव्यात असा दबावगट पक्षांतर्गत निर्माण होत आहे. दलित वर्गही मोठय़ा प्रमाणात पक्षाला स्वीकारत आहे. अर्धापूरमधील एक नगरसेवक दलित असल्याचे आमदार जलील आवर्जून सांगत आहेत. या निवडणुकीचा परिणाम सर्वत्र जाणवत असतो. पक्षाचा प्रभाव वाढतो आहे. पण अपेक्षित यश नसल्याने एमआयएमची कोअर टीम बरखास्त केली जाणार आहे.

मुंबईसाठी अकबरोद्दीन

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांपेक्षा शहरी भागातील निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांसाठी स्वत: असदोद्दीन प्रचारात उतरणार असून मुंबई महापालिकेची जबाबदारी अकबरोद्दीन यांच्याकडे असणार आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध असणारे अकबरोद्दीन मुंबई महापालिका निवडणुकीत रंगत आणतील, असे मानले जात आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, लातूर येथील नगरपालिकांसाठी पक्षबांधणी सुरू करण्यात आली आहे.

बिहारमध्ये निवडणुका लढविताना सर्व काही पहिल्यापासून करावे लागत होते. उत्तर प्रदेशात तसे करण्याची गरज नाही. संघटनात्मक सर्व बाबी तेथे पूर्ण असल्याने उत्तर प्रदेशातही एमआयएमचा मोठा प्रभाव जाणवेल, असा दावा आमदार जलील करतात.