सुहास सरदेशमुख, लोकसत्ता 

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये ‘सुवर्णसंपन्न’ महिला उमेदवारांच्या यादीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पहिला क्रमांक लागला आहे. त्यांच्याकडे साडेतीन किलोपेक्षा अधिक सोने आहे. बारामतीच्या प्रतिस्पर्धी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडेही सोने-चांदी मोठया प्रमाणात आहे.

उमेदवारांच्या संपत्तीमधील वाढीचे आकडे उपलब्ध होऊ लागले आहेत. एरवी आलिशान मोटारींतून फिरणारे नेते सर्वसामान्यांबरोबर चहा पिताना, पुरी-भाजी किंवा खिचडी खाताना दिसू लागले आहेत. असे असले तरी शपथपत्रामुळे त्यांची ‘श्रीमंती’ लपून राहिलेली नाही. उस्मानाबादमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची संपत्ती एक कोटी ३१ लाख २१ हजार ५०० रुपये आहे. यामध्ये ३ किलो ६३९ ग्रॅम सोने आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे दीड किलोपेक्षा अधिक सोने, २१ किलो चांदी व २८ कॅरेट हिऱ्याचे दागिने आहेत. सुप्रिया सुळे यांच्याकडेही एक किलो ९२७ ग्रॅम सोने आहे. अद्याप पंकजा मुंडे, भारती पवार, हिना गावीत, स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत. त्यांच्या विवरणपत्रांमध्येही सोन्याची झळाळी दिसू शकेल.

हेही वाचा >>> जाहीरनाम्यांची प्रतीक्षाच; पहिला टप्पा होऊनही शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून जाहीरनामे नाहीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राणेंकडे पत्नीपेक्षा अधिक सोने

जमीन, सोने व जडजवाहिरांचे प्रेम असणारे कुटुंब म्हणून नारायण राणे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या शपथपत्रात संयुक्त हिंदू कुटुंब म्हणून एकूण चार किलो ५९० ग्रॅम सोने असल्याचे दाखविले आहे. विशेष म्हणजे शपथपत्रानुसार राणे यांच्याकडे दोन किलो ५५३.२३ ग्रॅम व त्यांच्या पत्नीकडे एक किलो ८९१ ग्राम सोने आहे.

हेमामालिनींकडे ३३ कोटींचे दागिने

उत्तर प्रदेशातील मथुरेच्या खासदार व भाजप उमेदवार हेमामालिनी यांनी त्यांच्या शपथपत्रात त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व जडजवाहिरांची किंमत ३३ कोटी ३९ लाख २९२ दाखवली आहे. त्यांची एकूण संपत्ती २९७ कोटी रुपये असून त्यात १५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.