डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रकार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद :  विद्यापीठ नामांतर शहीद स्मारकास होत असलेली दिरंगाई, परीक्षेचा घोळ, शिक्षण परीक्षा शुल्क ५० टक्के माफ करावे आदी मागण्या करत औरंगाबाद येथे आलेले उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी केला. या प्रकारानंतर शिवीगाळ करणे, वाहन अडविणे आदी प्रकाराची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार करू, असे सामंत यांनी पत्रकार बैठकीमध्ये सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर बसून मंत्री सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. सामंत यांच्या विरोधात रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी आदी संघटनांनी औरंगाबादेत तर शुक्रवारी जळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी मागील महिन्यातही धुळे येथे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाणही करण्यात आली होती. याच संदर्भाच्या अनुषंगाने मंत्री सामंत यांनी  मंत्र्यांचा ताफा अडवणे, वाहनापुढे येणे, लाठय़ा-काठय़ा घेऊन पुढे येणे, अशी हिंमत कुठून येते, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत आपल्याबाबत घडलेल्या प्रसंगांची चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.

विद्यापीठात पदवी व पदव्युत्तरच्या नियोजित अंतिम परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी उच्च शिक्षणमंत्री सामंत आले असता  रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम, अतुल कांबळे, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्ने सोनवणे, अवेझ शेख, रोहित धनराज आदी कार्यकर्त्यांंनी  जोरदार घोषणाबाजी केली.

परीक्षार्थीच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी विद्यापीठ  शिक्षण विभाग, आरोग्य व महसूल विभागही काम करणार असल्याचे सांगत एक लाख १६ हजार विद्यार्थी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. त्यातील ३६ हजार बॅकलॉगचे आहेत. एकूण विद्यार्थ्यांपैकी ९० टक्क्य़ांवर विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार असल्याचे आढावा बैठकीनंतर सामंत यांनी सांगितले.  यावेळी रोहयोमंत्री संदीपान भुमरे,  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे उपस्थित होते.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempt to block car of higher education minister uday samant zws
First published on: 20-09-2020 at 00:23 IST