छत्रपती संभाजीनगर : बालकाच्या जन्मप्रमाणपत्रावर त्याच्या आईचे सासर व माहेरच्याही नावाचा उल्लेख एक रकाना वाढवून घेण्याच्या संदर्भाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मनीष पितळे व न्या. वाय. जी. खाेब्रागडे यांनी राज्य शासनास निर्देश दिले.
खंडपीठासमोर तीन वर्षाच्या मुलीचा पासपोर्ट तिच्या आईच्या माहेर व सासरकडील नावाच्या तफावतीमुळे नाकारण्यात आल्याचे प्रकरण आले होते. येथील एका अभियंता महिलेच्या आधारकार्डसह शैक्षणिक व इतर कागदपत्रांवर माहेरचे नाव आहे. पूर्ण नावामध्येही वडिलांचे नाव कायम आहे. तर त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीच्या आधारकार्डवर पतीचे नाव व आडनाव आहे.
मुलीच्या पासपोर्टशी संबंधित कागदपत्रांमध्ये आईच्या आधारकार्ड व वडिलांच्या आधारकार्डवरील नावात तफावत जाणवल्याने पासपोर्ट नाकारण्यात आला. त्यामुळे ॲड. गौरव एल. देशपांडे यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. ॲड. देशपांडे यांनी शासनाने जन्मप्रमाणपत्रामध्ये एक रकाना वाढवून आईच्या दोन्ही नावाची तरतूद करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती खंडपीठापुढे केली.
मुलाचे जन्मप्रमाणपत्र महापालिका अथवा नगरपालिका निर्गमित करते. तेव्हा रुग्णालयात जन्मलेल्या मुलाची नोंदणी केल्यानंतर जन्मप्रमाणपत्र देताना त्याच्या आईच्या नावाचा उल्लेख करताना लग्नापूर्वीचे नाव व लग्नानंतरचे नाव घेण्याबाबत खंडपीठाने यासंबंधी राज्याला निर्देश दिले. शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील राधाकृष्ण इंगोले पाटील यांनी काम पाहिले.