शिवसेना-भाजपच्या वादात काँग्रेसच्या आशा पल्लवित; एमआयएमच्या भूमिकेकडेही लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाभोवती शिवसेनेची मजबूत तटबंदी. खासदार चंद्रकात खरे तर भाजपमधून कोणीही उभे राहावे, असे खुले आव्हान देत आहेत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची नावे लोकसभेसाठी चर्चेत येऊ लागली. नुकतेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी चाचपणीची बैठक घेतली. त्यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आणि रया गेलेल्या जिल्ह्यतील काँग्रेसच्या नेत्यांनाही विजयाचे दरवाजे किलकिले होऊ शकतात, असे वाटू लागले आहे. भाजप-सेना हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर एकमेकांसमोर उभी ठाकल्यास काँग्रेससाठी औरंगाबादहून लोकसभेत जाण्यासाठी काँग्रेसला कायम बंद झालेला दरवाजा किमान किलकिला होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात फार कमी वेळा यश मिळाले होते. त्यामुळे शिवेसना-भाजप या दोन्ही पक्षाने निवडणूक लढविली तर यशाचा दरवाजा तरी उघडेल, अशी काँग्रेसच्या नेत्यांना आशा वाटू लागली आहे.

चंद्रशेखर राजूरकर, काझी सलेम, अब्दुला आझीम अब्दुल हमीद, सुरेश पाटील, बॅरिस्टर ए. आर. अंतुले, रामकृष्णबाबा पाटील व नितीन पाटील यांनी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढवली. त्यात काझी सलेम यांना १९८० मध्ये आणि १९९८  रामकृष्णबाबा पाटील यांना यश मिळविता आले. मात्र, शिवसेना उमेदवारांकडून पराभूत होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे आणि दिग्गज मंडळींनाही या मतदारसंघावर पकड मिळविता आलेली नाही. शिवसेना खासदार चंद्रकांत खरे यांच्याविषयीची नाराजी ऐन निवडणुकीमध्ये दिसत नाही. एरवी त्यांना अगदी नगरसेवकही विरोध करतात. त्यामुळे विजयाची गणिते घालताना नाराजांच्या विरोधातील माणूस आपल्या बाजूने असावा, अशी रचना त्यांना लावता येते. कन्नड मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव त्यांच्यावर नाराज असतात. ते शिवसेनेमध्ये आहेत की नाही, असे वाटावे असे चित्र निर्माण झाले होते. मध्यंतरी हर्षवर्धन जाधव यांना मातोश्रीवर बोलावणे आले. पण तत्पूर्वी हर्षवर्धन जाधव यांच्या मतदारसंघात संपर्क असणारे जाधव यांचे विरोधक उदयसिंह राजपूत यांच्याशी खैरे यांनी जुळवून घेतले. त्यांना अगदी पक्षप्रवेश देण्यापर्यंतची तयारीही त्यांनी केली. मध्यंतरी हे नवे समीकरण खरे लवकर सोडवतील, असे चित्र दिसत होते. मात्र, उदयसिंह राजपूत यांचा राष्ट्रवादीतून सेनेत घेण्याचा कार्यक्रम काहीसा लांबल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने उदयसिंह राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘ सध्याच्या राजकारणात शिवसेनेला त्यांचे आमदार सांभाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे लगेच माझा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार नाही. मात्र, वर्षभरानंतर पक्षप्रवेशही होईल आणि उमेदवारीही मिळेल, असा विश्वास आहे.’ या वक्तव्यावरून जो कार्यकर्ता अथवा आमदार नाराज असेल त्याच्या विरोधकाला बळ देत खरे स्वत:ची पकड मजबूत करतात असे दिसते. या पाश्र्वभूमीवर भाजपकडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू झाली आहे. नुकतेच या जिल्ह्यासाठी नेमण्यात आलेल्या प्रभारी महेंद्रसिंग यांनी एक बैठक घेतली. संघटनात्मक बांधणी कशी ढिल्ली आहे, यावर कार्यकर्त्यांना त्यांनी सुनावले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप पहिल्यांदाच औरंगाबादमधून ताकदीने उतरेल काय, या चर्चाना सुरुवात झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकर यांनी पक्षाने दिलेले सर्व आदेश पाळणार असल्याचे सांगत जर निवडणूक लढविण्यास  सांगितले गेले तर तयार असल्याचे संकेत नुकतेच एका पत्रकार बैठकीमध्ये दिले होते. त्यामुळे शिवसेना नेत्यांनीही त्यांना जाहीर आव्हान दिले आहे.  या पाश्र्वभूमीवर लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या मजबूत तटबंदला तडा देण्यासाठी भाजप मैदान उतरल्याने अवसान गेलेल्या काँग्रेसला बाळसे मिळाल्यासारखे वातावरण आहे. या अनुषंगाने बोलताना काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे म्हणाले की, ‘हा मतदारसंघ काँग्रेसला पोषक असल्याचे दिसून येत आहे. अगदी अलीकडेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यक्रमांनासुद्धा सर्वसामांन्य औरंगाबादकरांनी भरभरून दाद दिली. त्यामुळे वातावरण बदलत असल्याचे दिसत आहे.’

मतविभागणीवर काँग्रेसची मदार

आतापर्यंत शिवसेनेला झालेल्या मतदानापैकी सरासरी ४६.२६ टक्के मतदान पडले. तर काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी ४० टक्क्यांचा आतमध्येच आहे. केवळ एक वेळा रामकृष्णबाबा पाटील विजयी झाले होते तेव्हा काँग्रेसला ५०.९६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे भाजप निवडणुकीमध्ये उतरली तर सेना- भाजपमध्ये मतविभाजन होईल, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. मात्र, ही परिस्थिती एमआयएमच्या गणितावर अवलंबून असेल. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमचा उमेदवार नव्हता. मात्र, या वेळी आम्ही तयारी करतो आहोत, असे आमदार इम्तियाज जलील सांगत आहेत. निवडणुकीची तयारी केली पाहिजे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad lok sabha constituency bjp shiv sena mim congress
First published on: 10-10-2017 at 03:41 IST