मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंदिरांवरील भोंग्यांबाबत मोठं विधान केलंय. “सगळ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे. ते भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले पाहिजेत,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. मात्र, आधी मशिदींवरील भोंगे उतरतील आणि मगच मंदिरांवरील भोंगे उतरवू, असंही त्यांनी पुढे नमूद केलं. राज ठाकरे रविवारी (१ मे) औरंगाबादमधील सभेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “संपूर्ण देशातील हिंदूंना माझी विनंती आहे की मागचा पुढचा अजिबात विचार करू नका, हे भोंगे उतरलेच पाहिजेत. सगळ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे. ते भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले पाहिजे, पण मशिदींवरील भोंगे उतरल्यानंतर मंदिरांवरील भोंगे उतरवले जातील.”

“४ मे रोजी प्रत्येक ठिकाणी मला हनुमान चालिसा ऐकूच आली पाहिजे”

“सध्या ‘अभी नही तो कभी नही’ अशी स्थिती आहे. देशातील माझ्या सर्व देशवासीयांना, हिंदू बंधू भगिनींना विनंती आहे की जर यांनी ३ मेपर्यंत ऐकलं नाही, तर ४ मे रोजी प्रत्येक ठिकाणी मला हनुमान चालिसा ऐकूच आली पाहिजे. वाटल्यास पोलिसांकडून रीतसर परवानगी घ्या. त्यांना परवानगी द्यावीच लागते. ती परवानगी घेऊन तुम्ही या सर्व गोष्टी जोरात कराल आणि सामाजिक दृष्ट्या इतके वर्षे प्रलंबित प्रश्न कायमचा निकाली लागेल. यासाठी सर्वांनी हातभार लावावा,” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

भोंग्यावर बोलत असतानाच औरंगाबादमध्ये अजान सुरू, राज ठाकरे संतापून म्हणाले…

विशेष म्हणजे राज ठाकरे मशिदींवरील भोंगे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यावर बोलत होते त्यावेळीच अजान सुरू झाली. त्यामुळे राज ठाकरे संतापत म्हणाले, “माझी पोलिसांना नम्र विनंती आहे जर हे सभेच्यावेळी बांग सुरू करणार असतील तर आपण आत्ताच्या आत्ता ताबोडतोब तोंडात बोळा कोंबावा. सरळसरळ मार्गाने समजत नसेल, तर मग त्यानंतर काय होईल मला माहिती नाही. इथं जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय त्यांनी आत्ताच्या आत्ता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे”

“जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे. तुम्ही अजिबात शांत बसता कामा नये. संभाजीनगरच्या पोलिसांनी मी पुन्हा विनंती करतोय. हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे यांना एकदा दाखवावीच लागेल. म्हणून पोलिसांना विनंती आहे यांची थोबाडं पहिल्यांदा बंद करा,” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.