औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून भाजपाकडून जलआक्रोश मोर्च्याला सुरुवात झाली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून पाणी प्रश्नांवरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संबंधित जलआक्रोश मोर्चा हा सत्ता परिवर्तनासाठी नसून व्यवस्था परिवर्तनासाठी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना म्हटलं की, “पाण्यासाठी तहानलेल्या औरंगाबादची समस्या जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारला झोपू देणार नाही, हा संघर्ष सुरूच राहिल. महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. औरंगाबादचा माणूस त्रासलेला असताना भारतीय जनता पार्टी शांत बसू शकत नाही. आम्ही संघर्ष छेडला आहे. हा संघर्ष तेव्हाच संपेल जेव्हा औरंगाबादचा पाण्याचा प्रश्न संपेल, अशा इशाराही फडणवीसांनी यावेळी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे पाणी मागण्यासाठी गेलं तर काय उत्तर मिळू शकतं? यावर काव्यात्मक स्वरुपात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची काळी रेघ असते. ‘मी म्हणतो म्हणून संभाजीनगरला संभाजीनगर समजा, मी म्हणतो म्हणून बेफिकीर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा, नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, ‘ अशा शब्दांत फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं आहे.

त्यांनी पुढे म्हटलं की, आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. जनतेसाठी काम करत आहोत. तुम्ही औरंगाबादमधील केवळ पोस्टर फाडू शकता, पण जनतेचा हा आक्रोश फाडू शकत नाही. कारण हा जनतेचा आक्रोश आहे. औरंगाबादमध्ये सात-सात दिवस नळातून केवळ हवा येते. येथील महिला मनातल्या मनात महाविकास आघाडी सरकारला शिव्या-शाप देतात, त्या शिव्या-शाप तुम्हा बुडवल्याशिवाय राहू शकत नाहीत, असंही ते म्हणाले.