छत्रपती संभाजीगनगर : राखेच्या अवैध धंद्यातील गावगुंडांनी सुरक्षा रक्षकास केलेली मारहाण, औष्णिक वीज केंद्रावर केलेली दगडफेक, पुढे वाहने अंगावर घालण्यापासून ते अर्धमेला करेपर्यंत केलेल्या मारहाणीचा २०१९ पासूनच्या गुन्हेगारीचा चढा आलेख मांडणारी परळीमधील ४० गुन्ह्यांची यादीच महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी संपर्कमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडली. पहिल्याच बैठकीत राखेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर पंकजा यांनी पर्यावरण रक्षण एवढीच आपली भूमिका आहे, असे म्हणत राखेतील व्यवहार आणि गुन्हेगारीतून अंग काढून घेतले.

राखेतील गुन्हेगारांविषयी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध विभागांना केलेल्या ४२ हून पत्रांच्या जंत्रीमधील एका मजकुरात ३४४ अवैध राखेच्या व्यवहारातील वाहनांची यादीही प्रशासनास दिल्याचे परळी औष्णिक वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्यांनी नमूद केलेे. राखेतील गैरव्यवहारांची माहिती सादर झाल्यानंतर पंकजा ही माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली की नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

‘अराजकाच्या वर्तुळा’तील बीडमधील वस्तुस्थिती ‘लोकसत्ता’ने समोर आणल्यानंतर आता राखेच्या अवैध धंद्यातील तपशील अधिकारी सरकारच्या वरिष्ठांपर्यंत मांडू लागले आहेत. पंकजा यांच्यासमोर करण्यात आलेल्या सादरीकरणात कोरडी आणि ओली राख यातील निविदांची माहिती देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावगुंडांची दहशत

कोरडी राख उचलण्यासाठी १२ निविदाधारक पात्र असून त्यांचे काम सुरळीत करत असल्याचे सांगण्यात आले. वीजनिर्मितीवेळी कोळसा जाळल्यानंतर उरलेल्या राखेवर पाणी मारले जाते. ती ओली राख घेण्यासाठी १८ निविदाधारकांना पात्र वाहतूकदार म्हणून निवडले होते. ही ओली राख परळी औष्णिक वीज केंद्राच्या तलावात साठवली जाते, तेथून निविदाधारकांना ती राख उचलू द्यायची असते. पण तसे घडत नाही. गावगुंडांची ही दहशत संपर्कमंत्र्यांच्या समोर सांगितली.