‘१६८०’ची टोपी आणि ‘चला चला महापौर, नागपूरला चला!’

औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी मंजूर करण्यात आलेल्या १६८० कोटी रुपयांच्या योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. कार्यारंभ आदेश न मिळालेल्या सर्व पाणीपुरवठा योजनांना दिलेल्या स्थगितीत औरंगाबादची योजना अडकली असल्याचा दावा भाजपने केला. उपमहापौर विजय औताडे यांनी त्यासाठी राजीनामा दिला आणि त्याचे राजकीय स्वरूप अधिक टोकदार करण्यासाठी भाजप सदस्यांनी ‘१६८०’ अशी संख्या असणारी भगवी टोपी घातली आणि शिवसेनेला डिवचले. या योजनेची स्थगिती उठविण्यासाठी महापौरांनी नागपूरला जावे, असे  सांगत ‘चला चला महापौर, नागपूरला चला’ अशी घोषणाबाजी केली. भाजपच्या सदस्यांना शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केला. महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना शहर विकासाच्या महत्त्वाच्या पाणीपुरवठा योजनेला विरोध करत आहे, असा संदेश मतदारांपर्यंत जावा, असे प्रयत्न गुरुवारी सर्वसाधारण सभेत भाजपकडून केले गेले.

पाणीपुरवठा योजनेची भूमिका मांडताना नगरसेवक राजू शिंदे यांनी शहराला १०० दिवस पाणीपुरवठा करून ३६५ दिवसासाठी लावली जाणारी ४ हजारांहून अधिकची पाणीपट्टी जास्त असल्याचे सांगितले. गेली अनेक वर्षे शहराला नीट पाणीपुरवठा होत नव्हता म्हणून आमदार अतुल सावे यांच्या प्रयत्नांमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला मंजुरी दिली होती. मात्र, फडणवीस सरकारच्या काळातील निर्णयांना स्थगिती दिल्याने ही योजना अडचणीत आली. त्या विरोधात आंदोलन केले, असे सांगत महापौरांनी नागपूरला मुख्यमंत्र्यांकडे जावे आणि योजनेची स्थगिती उठवली आहे असे पत्र आणावे, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्याला प्रमोद राठोड, बापू घडामोडे, दिलीप थोरात यांनी पाठिंबा दिला. शिंदे यांचे भाषण सुरू असताना नगरसेवकांनी ‘१६८०’ अशी संख्या असणाऱ्या भगव्या टोप्या घातल्या होत्या.

या अनुषंगाने प्रशासनातील अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशी विनंती भाजपच्या सदस्यांनी केली. मात्र, पीठासीन अधिकारी म्हणून हा खुलासा मीच करेन, असे म्हटले. त्यावर महापौरांचा प्रशासनावर विश्वास नसेल तर त्यांनी तो खुलासा करावा. मात्र, हे पक्षाचे पद नाही, याची आठवण भाजप सदस्यांनी करून दिली. जोपर्यंत पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवली आहे, असे पत्र आणले जात नाही, तोपर्यंत आंदोलन केले जाईल, असे राजीनामा देणारे माजी उपमहापौर विजय औताडे यांनी सांगितले. भाजपच्या सदस्यांना रोखण्यासाठी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निविदा प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबतचे पत्र आले असल्याचे सांगितले. मात्र, निविदा प्रक्रिया सुरू असली तरी कार्यारंभ आदेश देता येणार नाहीत, अशी भूमिका घेत भाजपच्या सदस्यांनी ‘चला चला महापौर, नागपूरला चला’ असा घोषणांचा सपाटा चालूच ठेवला होता.