भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा सरपंचांना सल्ला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ गड्या हो भाषण करायला शिका’ हा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नवनिर्वाचित सरपंचांना दिला आहे. जिल्ह्यामध्ये भाजपचे ११७ सरपंच आणि ७५४ भाजपचे सदस्य ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्याचा दावा भाजपच्या वतीने रविवारी करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती.

नवनिर्वाचित सरपंचांनी कसे वागावे आणि पक्षासाठी सरपंच असल्यापासून कशा खस्ता खाल्ल्या हे आपल्या खास शैलीत सांगत खासदार दानवे यांनी रविवारी कार्यक्रमात रंगत आणली. ते म्हणाले, मी वयाच्या १८ व्या वर्षीच सरपंच झालो. खरे तर मतदार व्हायला २१ वर्षे लागतात. तेव्हा गावी मतदान केंद्र नव्हते. २५० मतदारांचा निकष होता. गावात तेवढी माणसे नव्हती. पाहुणे- राऊळ्यांची नावे टाकून झाली. पण संख्या काही जुळत नव्हती. मग सांगितले की, फूलपॅन्ट घालणाऱ्यांची नावे टाका. त्याच वर्षी पॅन्ट घालायला लागलो होतो.

मतदारांच्या यादीत आलो आणि सरपंच झालो. तेव्हा खेळ जमून गेला, अशी आठवण सांगत सरपंचपद हे किती अवघड काम असते असे त्यांनी सांगितले. सरपंच होण्यापूर्वी गावात एस.टी यायची नाही. रस्ता नव्हता तेव्हा. रस्ता तयार केला तर एस.टी देतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मग गावातील तरुणांनी मिळून श्रमदानातून रस्ता तयार केला. एस.टी आली. मग वीज नव्हती. ती आणण्यासाठी वेगळा संघर्ष करावा लागला. सरपंचपद सोपे नसते, असे सांगत रावसाहेब दानवे यांनी यापुढे गावात जाऊन तारे तोडू नका. आता सर्वत्र भाजपचे सरकार आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतिपद आणि पंतप्रधानापासून ते १८ राज्यात सत्ता आहे. त्यामुळे त्या पक्षाचे काम करतो आहोत, हे सांगायला विसरू नका. केलेल्या योजनांची माहिती अगदी लग्नाकार्यात द्या, असे सांगत भाषण करायला शिकून घ्या, असा कानमंत्र प्रदेशाध्यक्षांनी नवनिर्वाचित सरपंचांना दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.

तसले जेवण द्या

खास फेटे बांधून सत्काराची माळ गळयात पडली की औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील मंडळी सभागृहातून बाहेर जाऊ लागली. ही बाब चाक्षाणपणे हेरून कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल करण्यात आला. सत्कारांनतर भाषण करण्याऐवजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आधी भाषणे केली. उठून जाणाऱ्या सरपंचांना टोला मारताना दानवे म्हणाले, ही जात एक जागी बसतच नाही. सरपंच झाला की माणूस उठतो आणि पळतो. आता यांना प्रशिक्षण द्यायचे असल्याने आजचे जेवण न देता खास जेवण करा, अशी सूचना रावसाहेबांनी केली. हे खास जेवण मांसाहारी असावे, असे त्यांना सूचवायचे होते. खास जेवणाचा विषय निघाला आणि सभागृहात हशा पिकला.

मोदी जरुरत, खरे मजबुरी

सरपंचाच्या सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना भाजप उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी लोकसभा निवडणुकीमधील एका संदेशाची आठवण सांगितली. ते म्हणाले, तेव्हा एक संदेश खूप फिरला ‘ मोदी जरुरत खरे मजबुरी’ पण आता लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार असणार आहे. महेंद्रसिंग यांची या कामासाठी निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार असेल, असे प्रदेशाध्यक्षांसमोर कराड म्हणाले. त्यांच्या विधानावर नंतर मात्र कोणी फारसे भाष्य केले नाही.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp state president raosaheb danve advice sarpanch to learn speech
First published on: 23-10-2017 at 05:17 IST