छत्रपती संभाजीनगर : एका निबिड जंगलात धड वेगळे आणि मुंडके कुठेतरी पडलेल्या अवस्थेत दहा दिवसांपूर्वी सापडलेल्या मृतदेहामागचा उलगडा झाला असून, खुनाच्या या घटनेत पोलिसांना मारेकऱ्यापर्यंत पोहोचविण्यास मदतगार ठरली ती एक साधी क्लिप. मृताच्या कवटीतील जबड्यामध्ये आढळलेल्या या क्लिपनेच खून झालेला कोण आणि कृत्य करणारा कोण, याची माहिती समोर आली असून, घटनेपासून ते सुगावा लागेपर्यंत पोलिसांना तब्बल ३८ रुग्णालयांशी संपर्क करून तपास करावा लागला.
या संदर्भातील सर्व घटनाक्रम पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. विनयकुमार यांनी सांगितला. निखिल हिरामण सूर्यवंशी उर्फ लगड उर्फ पाटील उर्फ सुरसे (वय २८ वर्ष रा. सिंदी ता. चाळीसगाव जि. जळगांव) असे मृताचे नाव तर त्याच्याच गावचा रहिवासी आणि मित्र असलेला श्रावण धनगर, असे आरोपीचे नाव आहे. ३ सप्टेंबर रोजी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हददीतील गौताळा अभयारण्यात सायगव्हाण शिवारात गट नं. ७५ सनसेट पाँईट जवळील घनदाट जंगलात २५ ते ३० वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गळा कापून व धडापासून मुंडके वेगळे करून फेकून दिलेले आढळून आले होते. यावरून ४ सप्टेंबर रोजी गुन्हा करण्यात आला होता.
या प्रकरणाचे गांर्भीय ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी तपास पथक तयार केले. याच गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना मृताच्या अंगावरील अंडरवेअर, हातातील घडी तसेच जबडयामध्ये एक क्लिप बसवलेली आढळून आली होती. तसेच नमूद क्लिप अनुषंगाने शस्त्रक्रिया करणाऱ्या वेगवेगळ्या डॉक्टरांचीही भेट घेऊन माहिती मिळवताना संबंधित क्लिप ईगतपुरी तालुक्यातील धामणगाव घोटी येथील एसएमबीटी हॉस्पीटल नांदीहिल्स येथे बसविण्यात आल्याची माहिती मिळाली. तेथून माहिती घेतली असता मृत निखिलने २२ जुलै २०२३ रोजी बसवल्याचे पुढे आले.
तर निखिल हरवल्याची तक्रार ४ सप्टेंबर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. पथकाने निखिलचा भाऊ व कुटूंबातील इतर सदस्यांना मृताच्या अंगावरील अंडरवेअर व हातातील घडयाळ तसेच जबडयात बसवलेल्या क्लिप बाबत विचारणा केली असता त्यांनी दुजोरा देवून ओळख दिली. त्यानंतर पथकाने शिंदी गावात मुक्काम ठोकून जवळपास १०० ते १५० कॅमेरे लावून तपासणी केली. तसेच शिंदी, वडरा, सायगव्हाण, चाळीसगाव इत्यादी भागात फिरून मृत निखिलचे मित्र, नातेवाईक, शेजारी, गावातील नागरिक तसेच त्यांच्या संपर्कातील इतर लोक तो ज्या ज्या ठिकाणी काम करत होता यांच्याकडून माहिती घेतली.
मृत निखिल हा रोजंदारीवर धुमस चालविण्याचे काम करत होता. तसेच तो बक-या चोरण्याचे काम तसेच गावामध्ये गुंडगिरी देखील करत होता आणि या सर्व प्रकाराची त्याचा मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर याला माहिती होती, असे तपासात पुढे आले. यावरून पथकाने श्रावणवर नजर ठेवली. अखेर त्यास भावनाशील करून विश्वासात घेवून अधिक विचारपूस करताच श्रावणने गुन्हा कबूल केला. मी तुम्हाला सर्व सांगतो असे म्हणत ढसाढसा रडायला सुरूवात केली. निखिल यांने २६ ऑगस्टला मैत्रिणीला भेटायला जायचे म्हणून श्रावणला सोबत घेतले. पण श्रावणने सोबत घेतलेल्या कुऱ्हाडीचा घाव घालत, तुझ्यामुळे होणारी आपली बदनामी संपून लग्न तरी होईल म्हणत निखिलचे मुंडके व धड वेगळे केले.