छत्रपती संभाजीनगर : शहराच्या विकास आराखड्यातील रस्त्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. ही अनधिकृत बांधकामे काढून खुणा नोंद केली जाईल. मनपाची हस्तांतरणीय विकास हक्क देण्याची तयारी असली तरी त्यासाठी अद्याप एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. मनपा पाडापाडी करत असली तरी रस्ते तयार केले जाणार नाहीत. रस्ते तयार करण्यापूर्वी भूसंपादन प्रक्रिया राबवली जाईल, अशी स्पष्ट भूमिका मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी मांडली.

शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील रस्त्यांच्या जागेवर मनपाची परवानगी न घेता व गुंठेवारी न करता मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. अशा अनधिकृत बांधकामांच्या विरोधात मनपाने धडक कारवाई सुरू केली आहे. पडेगाव ते मिटमिट्यापर्यंत सुरू असलेल्या पाडापाडीची आज मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, पाडापाडी होत असली तरी लगेचच रस्ते करणार, असे वक्तव्य मी केलेले नाही. सध्या रस्ते करण्याचे कोणतेही नियोजन नाही.

विकास आराखड्यातील रस्त्यांवर थाटण्यात आलेली अनधिकृत बांधकामे काढण्याची कारवाई हाती घेण्यात आलेली आहे. मनपाची बांधकाम परवानगी न घेता व गुंठेवारी न करता डीपी रस्त्यावर अनधिकृत बांधकामे केली असतील तर ती पाडणारच. मुख्य रस्त्यालगत असलेल्या सेवा रस्त्यावर मनपाकडून विजेचे खांब रोवून खुणा केल्या जाणार आहे. चिकलठाणा, मुकुंदवाडी, बीड बायपास, पैठणरोडवर अनेक वर्षांपासून नागरिकांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत. मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभारल्या. त्यामध्ये व्यवसाय सुरू केला. मात्र, मनपाने बांधकाम परवानगी किंवा गुंठेवारी करून घेण्याची तयारी दाखवली नाही. गुंठेवारी करून घेतली असती तर ही बांधकामे वाचवता आली असती, असेही प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले.

गुंठेवारी व बांधकाम परवानगी घेतली तर रस्ते होणार

डीपी रोडवर रेखांकन करून ठेवण्यात येत आहे. त्या रस्त्यालगत असलेल्या जमीनीवर लेआऊट करून बांधकाम परवानगी घेतली किंवा गुंठेवारी केली तर त्या निधीतून भूसंपादन करीत रस्ते तयार केले जातील, असेही श्रीकांत म्हणाले. मनपा कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. सात दिवसांत विकास हक्क हस्तांतरण दिला जाणार आहे. मालमत्ताधारकांकडून अद्यापही अर्ज प्राप्त झालेला नसल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.