छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात सरासरी १७ दिवस पावसाचे असल्याने मशागतीसाठी शेतकऱ्यांना वेळ कमी मिळाला. आता उघडीप दिल्यानंतर मशागतीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कमी कालावधीमध्ये मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर आणि रोटावेटर या यंत्राचा सर्रास उपयोग होतो. एकरी १ हजार ५०० रुपयांचा दर आता १ हजार ८०० रुपयांपर्यंत वाढला असून, पूर्वी १ हजार २०० रुपयांपर्यंत रोटावेटरचा दर आता १ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. पाऊस लवकर सुरू झाल्याने कमी कालावधीमध्ये मशागत व्हावी म्हणून शेतकरीही आता दर वाढवून देऊ लागले आहेत.
दोन वर्षापूर्वी लोखंडाचे दर वाढल्याने नांगरणीचे फाळ, तसेच ट्रॅक्टरला लागणाऱ्या इतर अवजाराच्या किंमतीमध्ये दुपटीने वाढ झाली. या वर्षी अवजाराच्या किंमती फारशा वाढल्या नाहीत. मात्र, मशागतीसाठीचा खर्च वाढला असल्याचे शेतकरी सांगत आहेत, असे जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. प्रकाश देशमुख यांनी सांगितले. गेल्या दशकभरात ट्रॅक्टरमुळे मशागतीचा कालावधी कमी झाला आहे. मात्र, सलग पडलेल्या पावसामुळे वापसा झाला नाही. आता उघडीप मिळाल्यानंतर पेरणीपूर्व कामे करण्याची लगबग सुरू आहे. ट्रॅक्टरची संख्या जरी वाढली असली तरी पाऊस वाढला तर पेरणी लांबेल या भितीने मशागतीच्या कामाचे दर वाढले असल्याचे शेतकरी सांगतात.
करोनाकाळात ट्रॅक्टर खरेदीची चलती होती. आता मात्र ती मंदावली असल्याचे या व्यावसायातील व्यापारी सांगत आहेत. आता गावोगावी पेरणी करणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे पाऊस पडल्यावर आपली पेरणी लवकर व्हावी, यासाठी पेरणीचे कौशल्य असणाऱ्या मजुरांनाही अग्रीम पैसे दिले जात आहेत.