छत्रपती संभाजीनगर : भिंतीवर लीलया चढणारा आणि उतरणारा बेडूक मराठवाडा-खान्देशच्या सीमेवर एका घरात आढळला. हा बेडूक गोल्डन ट्री फ्राॅग म्हणजेच सोनेरी वृक्ष बेडूक प्रजातीतील लुसिस्ट म्हणजे पांढऱ्या रंगाचा असून, ही प्रजाती दुर्मीळ असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली. अलीकडच्या काळात दुसऱ्यांदा आढळलेला हा बेडूक आहे. यापूर्वी जानेवारीत सोयगाव तालुक्यात बनोटी येथे आढळलेल्या सोनेरी वृक्ष बेडकाची नोंद झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या पोर्टलवर व लोक जैवविविधता नोंदवहीत झाल्याची माहिती सिल्लोड वनविभागाच्या मानव वन्यजीव संघर्ष समितीचे सदस्य डॉ. संतोष पाटील यांनी दिली.

भिंतीवर चढणारा पांढरा बेडूक हा सोयगाव तालुक्यातील फर्दापूरपासून एक किलोमीटर असलेल्या वाकोद (ता. जामनेर) गावातील बस वाहक तथा शेतकरी ज्ञानेश्वर सावळे यांच्या घरात आढळून आला. सावळे यांच्या घरात त्यांचे सिल्लोड येथील नातेवाईक जि. प. शिक्षक गोपाल पांढरे यांच्या दृष्टीस पडला. आढळून आलेला बेडूक हा पांढराशुभ्र व अंगावर थोडे तपकिरी ठिपके असलेला आहे. त्याची लांबी ५ ते ६ इंच आहे. हा बेडूक भिंतीवर ज्या पद्धतीने चढतो त्याच गतीने उलट फिरतोही.

हा बेडूक ‘लुसिस्ट’ म्हणजेच त्वचेत मेलानीन नामक रंगद्रव्य अजिबात निर्माण न झाल्याने पांढराशुभ्र बनला आहे, असे डाॅ. पाटील यांनी सांगितले. तर सध्या या बेडकास एका नाल्यात स्वच्छ पाण्याचे डबके तयार करून सोडण्यात आले आहे. त्या ठिकाणी घरातील साबण, डिटर्जंट, फिनाईल आदी रसायन मीश्रित पाणी जाणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे, असे ज्ञानेश्वर सावळे यांनी सांगितले.

या प्रजातीचे शास्त्रीय नाव पॉलिपेडेट्स ल्यूकोमिस्टस असे आहे. या बेडकाच्या तळव्यावर असणाऱ्या म्यूकोसल ग्रंथींतून स्रवणारा चिकट स्लेष्मा (म्यूकस), कॅपिलरी व हायड्रोडायनामिक दाब, यामुळे हा बेडूक, भिंतीवर, झाडांवर, सहज चढू व उतरू शकतो. रक्तवाहिनीच्या दाबामुळे ही प्रक्रिया नियंत्रित होते. याची त्वचा नरम व गुळगुळीत असते. डॉ. संतोष पाटील, वन्यजीव अभ्यासक