छत्रपती संभाजीनगर : बोचऱ्या थंडीत कुडकुडत शेकोटी पेटवून शेकत बसण्याचे किंवा रजई, जाड मखमली चादरीमध्ये घुमटून झाेपण्याच्या दिवसांमध्ये पावसाळ्यासारखे ढगाळ आणि धो-धो बरसणारे वातावरण हवामानातील कमालीचे बदल दर्शवत असून, त्याचे परिणाम मानवी आरोग्यावरही होत आहेत. मोठ्यांसह बालकांसाठी ही हवापालट ‘ताप’दायक ठरत असून, काही साथरोगाच्या आजारांनीही डोके वर काढले आहे.

शिशू-बालकांमध्ये आरएसव्ही व्हायरस निमोनिया अर्थात विषाणूजन्य न्यूमोनियाची साथ आढळून येत आहे. हा एक फुफ्फुसाचा संसर्ग असून, तो इन्फ्लूएंझा (फ्लू) रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (आरएसव्ही) विषाणूंमुळे होतो. यामुळे फुफ्फुसातील हवेच्या पिशव्या सुजतात आणि द्रव भरल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. खोकला, ताप, थंडी वाजून येणे, धाप लागणे आणि छातीत दुखणे, अशी याची लक्षणे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

मुलांमध्ये ‘हँड फूट माऊथ डिसिज’ही आढळून येत आहे. म्हणजे तळहात, तळपाय, तोंडामध्ये पाणी भरल्यासारखे पुरळ येतात. पाच वर्षांखालील मुलांमध्ये हा आजार सध्याच्या वातावरणात आढळून येत असून, फाॅक्सॅकी या विषाणूमुळे हा आजार होतो. यासह नेहमीचे हवामान बदलानंतरचे सर्दी, ताप, खोकला या आजारांनीही मुले त्रस्त असून शासकीय, महानगरपालिकांची व खासगी बालरुग्णालयांमधील बाह्यरुग्ण कक्षांमध्ये गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

दोन वर्षांखालील मुलांमध्ये आरएसव्ही व्हायरस निमोनियाची साथ सुरू आहे. यामध्ये मूल गंभीर होते. वेळीच उपचार सुरू झाले तर बाळ लवकर आजारातून बाहेर पडू शकते.- डाॅ. गुरुप्रसाद देशपांडे, शिशू-बालरोग तज्ज्ञ

सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दररोज १५० च्या आसपास आजारी बालक येत आहेत. नेहमीच्या आजारांचीच ही बालके आहेत. यानंतरच्या वातावरणात संख्येत साधारण वाढ होत असते.- डाॅ. प्रभा खैरे, प्रमुख, बालरोग विभाग, घाटी.